‘शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन, रिक्त पदांपैकी ५० टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे,’ असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिले. वर्गात शिक्षकांचे छायाचित्र लावण्याऐवजी शाळेतील परिचय फलकावर शिक्षकांचे छोट्या आकाराचे छायाचित्र लावण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्य मंडळात झाली. या बैठकीत केसरकर यांनी शिक्षण विभागातील विविध विभागांचा आढावा घेतला. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे शिक्षकांच्या रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याला अचडण नाही. त्यामुळे ही पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. त्याच वेळी राज्यातील काही शाळांमध्ये दोन विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत आहे, तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यातून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांच्या समायोजन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल. शिक्षक भरतीसोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहे.’
वर्गात शिक्षकांचा फोटो नाही
विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांची माहिती व्हावी, यासाठी आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे छायाचित्र वर्गात लावण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, या निर्णयावर शिक्षकांनी संताप व्यक्त केला आणि विरोध केला. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. त्याबाबत केसरकर म्हणाले, ‘देशातील इतर राज्यातील तुलनेत महाराष्ट्रात शिक्षकांऐवजी इतर व्यक्ती शिकवण्याचे प्रमाण नगण्य आहे. केंद्राच्या आदेशाप्रमाणे फोटो लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे या निर्णयाबाबत प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार आता शिक्षकांचे छायाचित्र वर्गात लावण्याऐवजी परिचय असणाऱ्या फलकावर छोट्या आकारात लावण्यात येईल.’
पाठ्यपुस्तकांमध्येच वह्या
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, पुढील वर्षीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची जोड देण्यात येणार आहे, असा पुनरुच्चार शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला. एका इयत्तेला तीन पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये धडा संपला की, काही कोरी पाने देण्यात येईल. विद्यार्थ्यांना या पानांचा उपयोग वहीसारखा करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेगळ्या वह्या आणण्याची गरज भासणार नाही. पुढील शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.
शालेय़ शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यापासून, विभागातील घडामोडींची बारकाईने माहिती घेत आहे. त्यासाठी मला वेळ हवा आहे. एखाद्या विषयावर सविस्तर माहिती न घेता, विधाने करणे मला पटत नाही. आगामी काळात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासोबतच, शालेय शिक्षणात कौशल्य विकासावर भर देण्यासाठी काम करणार आहे. काही दिवसांत शालेय शिक्षण विभागात शैक्षमिक गुणवत्ता वाढीसारख्या चांगल्या सुधारणा दिसतील अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या