श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे
मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनेक वर्षे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ राहिलेल्या फलंदाजांसह यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या अनुभवी चौकडीला निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय कसोटी संघातील स्थान गमावावे लागले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या खांद्यावर कसोटी संघाच्याही कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघात उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार हा एकमेव नवा चेहरा आहे. केएल राहुल या मालिकेला मुकणार असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आले असले तरी त्याला तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ ते ८ मार्च या कालावधीत मोहाली, तर दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च या कालावधीत बंगळूरु येथे खेळवला जाईल.
बाहेर का? रहाणे, पुजारा,
साहा आणि इशांत यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे जानेवारीतील दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्याचे निर्देश देण्यात आले होते, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. आता त्यांना पुनरागमनासाठी रणजीत चमकदार कामगिरी करावी लागेल.
The post मुंबईकर रहाणे, पुजाराला वगळले; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे appeared first on Loksatta.