रोगाला बळी न पडता एकरी १७ क्विंटल उत्पादनाची क्षमता
चंद्रपूर : चद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नवे वाण शोधून काढले असून त्याला केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे गरमडे यांना १५ वर्षांसाठी या वाणाचे उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात किंवा निर्यात करण्याचा अधिकार मिळाले असून सोयाबीन वाणाच्या बाबतीत असे अधिकार मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले शेतकरी आहेत.
वायगाव भोयर येथील शेतकरी सुरेश गरमडे यांना बारा वर्षांपूर्वी त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये वेगळय़ा गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्षे बियाण्याची वाढ करत त्याचे जतन व संवर्धन केले. हे वाण एकरी १७ क्विंटल उत्पादन देते, तसेच इतर जातीच्या तुलनेत त्यात तेलाचे प्रमाण जास्त आहे.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गरमडे यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली. सलग आठ वर्षांपासून एकच निष्कर्ष हाती येत असल्याने कृषी अधिकारीदेखील थक्क झाले, असा दावा गरमडे यांनी केला आहे. वाणाचे स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी गरमडे यांनी वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले, राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पुण्याच्या स्वामित्व हक्क प्राधिकरण कार्यालयात मे २०१८ मध्ये प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठवण्यात आला. त्यानंतर सलग तीन वर्षे सोयाबीन संशोधन केंद्रात या वाणाचा आढावा घेण्यात आला. तिथेही हे वाण सरस आणि वेगळे आढळून आल्याने प्राधिकरणाने गरमडे यांना त्यांच्या वाणाचे उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात किंवा निर्यात करण्याचा अधिकार दिला आहे. हे वान सोयाबीन उत्पादनात क्रांती ठरू शकते, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करू शकते. म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ, असा निर्धार गरमडे यांनी व्यक्त केला आहे.
प्रचलित जातींपेक्षा या सोयाबीनची चकाकी आणि रंग गळद असल्याने इतर सोयाबीनच्या तुलनेत या सोयाबीनला जास्त भाव मिळतो, असा अनुभव शेतकरी विनोद सावसाकडे यांनी सांगितला. स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी गरमडे यांना अनेकांनी सहकार्य केले. त्यामध्ये प्राधिकरणाचे उपसचिव डॉ. एस. बी. गुरव, आत्मा संचालक मनोहरे, तत्कालीन कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, कृषी अधिकारी जयंत धात्रक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश काळे, आत्मा तालुका समन्वयक घागी, प्रगतिशील शेतकरी विनोद राऊत, श्रीकांत एकुडे यांनी सहकार्य केले.
वाणाची वैशिष्टय़े
* हे वाण प्रतिकूल हवामानातही ‘यलो मोझॅक’ रोगाला बळी पडत नाही.
* एकरी १७ क्विंटल उत्पादन देते.
* एसबीजी-९९७ वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटपर्यंत वाढते.
* एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात. तीन ते चार दाण्याच्या शेंगा सर्वाधिक असतात.
* इतर जातीच्या तुलनेत तेलाचे प्रमाण जास्त आहे.
सुरेश गरमडे यांना एसबीजी-९९७ वाणाकरिता केंद्र सरकारचे स्वामित्व हक्क मिळाले असून ही अभिमानाची गोष्ट आहे. कृषी विभाग त्यांना विविध पातळय़ांवर मदत करत असून महाराष्ट्रात बियाणे विक्रीचा परवाना त्यांना मिळावा यासाठी सहकार्य करू.
– भाऊसाहेब वऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.
सध्या सोयाबीनचे काही वाण कालबाह्य झाले आहेत. त्या ठिकाणी एक वेगळी सोयाबीन जात पुनस्र्थापित करणे गरजेचे होते. ही गरज हे वाण पूर्ण करू शकते.
– मारोतराव पालारपवार, सोयाबीन संशोधक.
The post चंद्रपूरच्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या नव्या वाणाचे स्वामित्व हक्क ; १५ वर्षांसाठी उत्पादन, विक्री, वितरणाचे अधिकार; appeared first on Loksatta.