मराठी सृष्टीत विनोदी अभिनेत्री म्हणून खूप कमी नायिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यात अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. विनोदी नायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. २३ जानेवारी २०२२ रोजी प्राजक्ताच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. तिच्या या गोड बातमीने सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने बेबीशॉवरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

प्राजक्ताची विशेष उठावदार भूमिका ठरली ती एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील सोनियाच्या पात्रामुळे. राधाची मैत्रीण सोनिया प्राजक्ताने अतिशय सुरेख निभावली होती. वादळवाट, पुणेरी मिसळ, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतून विविधांगी भूमिका साकारत असताना तीने लूज कंट्रोल, वेडिंगचा शिनेमा, धुरळा हे चित्रपट तसेच डब्बा गुल, कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, फु बाई फु सारखे विनोदी कार्यक्रम आपल्या विनोदी अभिनयाने गाजवले होते . योगेश शिरसाट आणि प्राजक्ताची जोडी त्यांच्या विनोदी स्किटमधून प्रेक्षकांना खूपच भावली होती. फु बाई फु या शोमुळे प्राजक्ताचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. अभिनयाबरोबरच प्रजक्ताने काही कुकरी शो देखील होस्ट केले आहेत. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि ते सर्वांना खाऊ घालणे हे तिचे आवडीचे काम आहे. अनेकदा वृत्तपत्रात तिने लिहीलेले लेख प्रसिद्ध झालेले पाहायला मिळतात. खाण्यासोबतच प्राजक्ता आणि तिच्या नवऱ्याला फिरायला जायची भारी हौस आहे.

प्राजक्ताचे संपूर्ण बालपण मुंबईतच गेले. दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर आणि पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले. इथूनच अभिनयाची गोडी तिच्यात निर्माण झाली. चित्रपट, मालिका असा तिचा अभिनयातील प्रवास उल्लेखनीयच म्हणावा लागेल. लवकरच प्राजक्ता महेश टिळेकर यांच्या हवाहवाई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ वर्षांपूर्वी बार्शी येथील रजत ढाळे यांच्यासोबत प्राजक्ताचा विवाह झाला. रजत ढाळे हे फार्मसिस्ट आहेत. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसि येथे ते कार्यरत होते. बस्ता या चित्रपटात तिने साकारलेली काहीशी विरोधी भूमिका देखील खूपच लक्षवेधी ठरली होती. ‘जरा विसावू या वळणावर’….असे कॅप्शन देऊन प्रजक्ताने आपल्या डोहाळजेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यानंतर तिने कन्यारत्न प्राप्ती झाले असल्याचे कळवले आहे. प्राजक्ता हनमघर आणि रजत ढाळे कन्यारत्न प्राप्तीनिमित्त खूप खूप अभिनंदन…