या महिलेविरोधात २६ हजार आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले होते.
पत्रकार व लेखिका असलेल्या महिलेची समाज माध्यमांवर बदनामी करून तिला बलात्कार व हत्येची धमकी दिल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी २४ वर्षीय तरूणाला भोपाळवरून अटक केली. या महिलेविरोधात २६ हजार आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले होते. याप्रकरणी चार ट्वीटर व दोन इन्स्टाग्राम खाते धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
सिद्धार्थ श्रीवास्तव( २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो भोपाळ येथील रहिवासी आहे. सध्या तो नोकरी करून आपला चरितार्थ चालवतो. त्याने १० वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने इंग्रजी टेलिव्हिजन मालिकेच्या नावावर आधारीत नावाने एक इन्स्टग्राम खाते उघडले होते. नुकतीच आरोपीने तक्रारदार महिलेला धमकावले होते. आरोपीने तक्रारदार महिलेला ठार मारण्याची धमकी दिली होती. शिवाय, त्याने महिलेबद्दल अश्लील टिप्पणीही केली होती. आरोपी एखादा गट अथवा पक्षाशी संबंधीत आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
अटकेनंतर तक्रारदार महिलेने ट्वीटरवरून मुंबई पोलीस व पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहेत. तक्रारदार महिलेला सौदी अरेबियामध्ये बंदी असल्याची खोटी माहिती ट्वीटरवर प्रसारीत करण्यात आली होती. तसेच त्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार तिने २८ जानेवारीला दिली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी भादंवि कलम ३५४(अ), ५०९, ५०६(२), ५०० व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६(क) व ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अश्लील टिप्पणी व शिवीगाळ करणारे २६ हजार ट्वीट या महिलेविरोधात करण्यात आले होते. इतर समाज माध्यमांवरही तक्रारदार लेखिकेला धमकावण्यात आले होते. अनेक प्रसिद्ध पत्रकार व प्रतिथयश व्यक्तींनी समाज माध्यमांवर लेखिकेबाबत ट्वीट करून तिला पाठींबा दर्शवला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.