वाशीम, सातारा जिल्ह्यात विशिष्ट प्रकारच्या सापळय़ाचा वापर; वनखात्याचे दुर्लक्ष
नागपूर : विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अवघ्या दहा दिवसांत दोन बिबटय़ांच्या शिकार प्रकरणात बहेलिया टोळीच्या शिकारी सापळय़ांचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्याच्या वनखात्यासमोर पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांनी आव्हान उभे केले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे चार फेब्रुवारी आणि सातारा जिल्ह्यातील कराड येथे आठ फेब्रुवारीला बिबटय़ांच्या शिकारीच्या प्रयत्नात बहेलिया शिकारी वापरत असलेले विशिष्ट पद्धतीचे सापळे आढळले आहेत.
विदर्भात २०१२-१३ ते २०१७ पर्यंत वाघांच्या शिकारीची अनेक प्रकरणे उघडकीस आली. या काळात मध्यप्रदेशातील शिकारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बहेलिया शिकाऱ्यांनी उच्छाद मांडला होता. अमरावती वन्यजीव गुन्हे विभाग व नागपूर वनविभागाने मोठय़ा कारवाया करत बहेलियांचे जाळे उद्ध्वस्त केले. २०१७ नंतर शिकारीचे हे सत्र थांबले आणि बहेलिया शिकारी टोळय़ांचा समूळ नायनाट झाला, याच भ्रमात राज्याचे वनखाते होते. दरम्यान, या क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थांनी खात्याला बहेलियांचा धोका संपलेला नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे म्हणणे आता खरे ठरत आहे. कारंजा लाड वनपरिक्षेत्रात चार फेब्रुवारीला ज्या शिकारीच्या सापळय़ात अडकून बिबटय़ाचा मृत्यू झाला तो बहेलिया सापळाच होता. आठ फेब्रुवारीला सातारा जिल्ह्यातील कराड येथे या सापळय़ात एक बिबट अडकला. त्यामुळे विदर्भापुरते मर्यादित असलेल्या बहेलिया शिकाऱ्यांनी आता उर्वरित महाराष्ट्रातही पाय पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत वन्यजीव विभागाला लक्ष्य केलेल्या बहेलिया शिकारी जमातीने प्रादेशिक वनखात्यातही वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी शिरकाव केला आहे.
शोध मोहीम राबवायला हवी बहेलियांच्या कारवाया वन्यजीवच नाही तर प्रादेशिक विभागातही आहेत. या शिकारी जमातीपासून विदर्भ थोडय़ाफार प्रमाणात ‘अलर्ट’ असला तरीही पश्चिम महाराष्ट्रातही तो हवा, हे मंगळवारच्या घटनेने सिद्ध झाले आहे. वनखात्याने यावर लक्ष ठेवणे आवश्यक असून पोलीस खात्याच्या मदतीने वनखात्याने शोध मोहीम राबवायला हवी. – रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा.
विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या इतरही भागात उघडकीस येणारी शिकार व अवैध व्यापार प्रकरणे रोखणे हे मोठे आव्हान आहे. यासाठी कायमस्वरूपी व स्वतंत्र प्रभावी यंत्रणा असणे गरजेचे आहे. स्थानिक वन्यजीव प्रेमींची मदत घेतल्यास घेतल्यास उपयोगी ठरेल. निवडक जिल्ह्यातील निवडक कारवाया वगळता राज्यात इतरही जिल्ह्यात शिकारी व अवैध व्यापार उघडकीस येण्यासाठी प्रयत्न व कारवाईसाठी पोलीस विभागाच्या धर्तीवर राज्य वन अपराध नियंत्रण ब्युरो असणे अत्यावश्यक आहे. – यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.
The post महाराष्ट्रासमोर पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांचे आव्हान appeared first on Loksatta.