राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी गुरुवार १७ फेब्रुवारीला मुलाखती होणार आहेत.
विद्यापीठात पुन्हा नियम डावलणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी गुरुवार १७ फेब्रुवारीला मुलाखती होणार आहेत. यात पुन्हा एकदा शैक्षणिक आणि अनुभवाची अर्हता डावलून ग्रंथपाल पदावर असलेल्या व्यक्तीची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यासाठी खुद्द प्रशासनाकडूनच मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार, अधिष्ठाता हे पूर्णवेळ पद निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे अधिष्ठातापदाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने जानेवारी २०१९ ला चारही विद्याशाखांच्या अधिष्ठातापदासाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू केली. तीन विद्याशाखांसाठी अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, दोनदा मुलाखती घेऊनही अद्याप आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. ग्रंथपाल आणि आंतर विद्याशाखेसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, मुलाखतीला आलेल्या तिघांपैकी एकही उमेदवार पात्र नसल्याचा शेरा समितीने दिला.
त्यामुळे पुन्हा आंतरशाखीय शाखा अधिष्ठात्याविना राहिले. या मुलाखतीदरम्यान काही पात्र उमेदवार असतानाही केवळ आपल्या मर्जितील व्यक्ती नसल्याने निवड करण्यात आली नसल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा १७ फेब्रुवारीला मुलाखती होणार आहेत. मात्र, यासाठी एका नामवंत महाविद्यालयामध्ये ग्रंथपालपदी असणाऱ्याची अधिष्ठातापदी नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या पदासाठी प्राचार्यपदाची शैक्षणिक पात्रता आहे. तसेच अध्यापन आणि संशोधनाचा पंधरा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. मात्र, ग्रंथपाल पदावरील व्यक्तीकडे शैक्षणिक अर्हता सारखी असली तरी अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव नसतो. असे असतानाही ग्रंथपाल पदावरील व्यक्तीच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
शैक्षणिक अर्हता काय हवी?
जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार, अधिष्ठातापद निवड समितीच्या शिफारसीनुसार कुलगुरूकडून नियुक्ती करण्यात येते. अधिष्ठातापदाचा अवधी हा कुलगुरूच्या पदाइतकाच किंवा त्याचे नियत वयोमान पूर्ण होईपर्यंत असते. या पदाच्या निवडीची अर्हता व अनुभव प्राध्यापक किंवा प्राचार्य पदावी जी अर्हता असेल तीच अर्हता असते. अध्यापनाचा व संशोधनाचा अनुभव एकूण पंधरा वर्षांपेक्षा कमी नसवा, अशी अट आहे. असे असतानाही ग्रंथपाल पात्र कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.