एकाच क्षेत्रात काम करणारया जोडय़ा जशा अनेक क्षेत्रात दिसून येतात त्यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीचा जरा जास्तच वाटा आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर प्रेमाचे सूर जुळताच आयुष्याच्या फ्रेममध्येही एकत्र येणारया जोडय़ा काही कमी नाहीत. एकमेकांच्या कामाचे कधी कौतुक करत तर कधी एकमेकांना सूचना देत या अभिनेता व अभिनेत्री आनंदाने संसार करत असतात. अशाच जोडयांमध्ये एक नाव आहे ते अभिनेते मिलिंद जोशी आणि अभिनेत्री अल्पा जोशी यांचे. गेल्या वर्षभरापासून मराठी टीव्हीदुनियेत लोकप्रियतेच्या आलेखात चर्चेत राहिलेली येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील स्वीटूचे सासरे आणि खानविलकर ग्रुपचे मालक मिस्टर खानविलकर यांची भूमिका साकारणारया अभिनेते मिलिंद जोशी यांची पत्नीही उत्तम अभिनेत्री आहे.

अनेक हिंदी मालिकांमध्ये अल्पा यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. हिंदी मालिकेतील सासू, आई, काकी, भाभी अशा सोज्वळ तर कधी दुधात मीठाचा खडा टाकणारया खलनायिकेची व्यक्तीरेखाही अल्पा यांनी वठवल्या आहेत. मराठी, हिंदी व गुजराती सिनेमा, नाटक व मालिकांमध्ये काम करणारया अल्पा या मिलिंद यांच्या पत्नी आहेत हे खूप कमीजणांना माहित असले तरी टीव्ही इंडस्ट्रीत ही रिअललाइफ जोडी आपल्या कमाल अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. हिंदी मालिकांमधील भल्या मोठय़ा एकत्र कुटुंबात एक ठसठशीत व्यक्ती आपल्याला नेहमीच दिसते. या भूमिकेसाठी चपखल बसणारे असे अल्पा यांचे व्यक्तीमत्व असल्याने आजवरच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात त्यांनी बाजी मारली आहे. गुजराती कुटुंबात जन्म झालेल्या अल्पा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ससुराल सिमर का, कितनी मोहब्बत है या मालिकेत अल्पा यांनी अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या शिवाय त्यांनी काही गुजराती व्यावसायिक व प्रायोगिक नाटकातही काम केले आहे. एका हिंदी मालिकेच्या निमित्ताने मिलिंद आणि अल्पा यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अल्पा या हिंदी व गुजराती टीव्हीदुनियेत काम करतात तर मिलिंद हे हिंदी गुजरातीसह मराठी मालिका व वेबसिरीजमध्येही अभिनय करताना दिसतात. सध्या मिलिंद जोशी यांची येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सुरू आहे. काही दिवसात या मालिकेचा शेवट होणार असला तरी गेल्यावर्षीपासून ही मालिका गाजत होती. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची जोडीही खूप लोकप्रिय झाली. प्रेमात गरीब किंवा श्रीमंत याला महत्त्व नसून तुमची मैत्री किती घटट आहे, त्यातून निर्माण होणारी नातीच शेवटपर्यंत टिकतात या वनलाइन स्टोरीवर या मालिकेची कथा गुंफण्यात आली होती. शकुंतला खानविलकर यांच्या पतीच्या भूमिकेत दिसलेले मिलिंद जोशी यांनी या कथेतील एक शांत व संयमी नवरा अत्यंत चांगला साकारला आहे. श्रीमंतीची हवा डोक्यात गेलेल्या मुलीला साथ न देता समजूतदार सुनेची बाजू पटणारे स्वीटूचे सासरे म्हणून मिलिंद जोशी यांनी चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.