विराट कोहलीनं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, असं साबा करीम म्हणाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून माजी कर्णधार विराट कोहली याच्या कर्णधारपदावरून सुरू झालेली चर्चा अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. आधी विराटनं टी-२० चं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर विराट कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनदेखील पायउतार झाला. त्यामुळे या मुद्द्यावरून भारतीय क्रिकेट विश्वास मोठं वादळ उठलं. त्यात विराट-रोहितमध्ये सारंकाही आलबेल नसल्याच्या देखील चर्चा सुरू असताना आता माजी भारतीय क्रिकेटपटू साबा करीम यांनी नवा खुलासा केला आहे.
“विराटनं कर्णधारपद सोडणं अपेक्षित नव्हतं”
विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यानं कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून देखील पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना साबा करीम यांनी विराटनं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, असं म्हटलं आहे.
पाकिस्तान प्रिमियर लीगच्या सामन्यात झळकलं विराटचं पोस्टर; पोस्टवरील ओळ पाहून शोएब अख्तर म्हणाला…
“विराट कोहलीनं अचानक कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळेच बीसीसीआयला दुहेरी कर्णधारपदाचा निर्णय बदलावा लागला. कसोटी संघासाठी स्वतंत्र कर्णधार आणि एकदिवसीय आणि टी-२० संघासाठी वेगळा कर्णधार असावा असा बीसीसीआयचा निर्णय होता. मात्र, कोहलीनं कसोटी संघाचं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं. त्याच्या राजीनाम्यामुळेच रोहीत शर्माला तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधार करावं लागलं”, असं साबा करीम म्हणाले.