
कोटा : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारी मोटार रविवारी पहाटे चंबळ नदीत कोसळून झालेल्या अपघातात नवऱ्यामुलासह ९ जण ठार झाले. चालकाला पेंग आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवाडा खेडय़ातील हे वऱ्हाडी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील उज्जैन येथे लग्न समारंभासाठी निघाले. इतर वऱ्हाडय़ांना घेऊन जाणारी एक बसही त्यांच्यासोबत होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास, चालकाला पेंग आल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि नयापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुलावरून चंबळ नदीत कोसळली, अशी माहिती पोलीस अधीक्षक केसर सिंह शेखावत यांनी दिली.
या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. अपघातग्रस्त मोटार पाण्यात सात ते आठ फूट खोल बुडाली होती. सुरुवातीला ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि दोन मृतदेह नंतर हाती लागले.
लोकसभेचे अध्यक्ष आणि कोटा- बुंदीचे खासदार ओम बिर्ला व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अपघातातील जीवहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये, तर ज्या कुटुंबातील दोन किंवा त्याहून अधिक सदस्य अपघातात मरण पावले आहेत, त्यांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
The post राजस्थानमध्ये वऱ्हाडाची बस नदीत कोसळून ९ जण ठार appeared first on Loksatta.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
