मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पावरील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) प्रवास शिस्तीचा आणि सुरक्षित करण्यासाठी या सागरी सेतूवर ‘इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम’ (आयटीएस) अर्थात अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेअंतर्गत सेतूवर फास्टॅग यंत्रणा बसविण्यात येणार असून १३३ सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येईल.
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात रोखत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. तर मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरही आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. आता ‘एमएमआरडीए’नेही शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर आयटीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही सेवा बसविण्यात येईल. दोन भागांत ही यंत्रणा बसविण्यात येईल. पहिल्या भागात टोल वसुलीसाठी फास्टॅगसाठी अत्याधुनिक प्रणाली बसविण्यात येणार आहे. तर दुसऱ्या भागात महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसविली जाईल. यामध्ये संपूर्ण मार्गावर १३३ सीसीटीव्ही कॅमरे, १३३ व्हिडिओ शोध कॅमेरांसह मोबाइल रेडिओ सिस्टम यांचा समावेश आहे. तर या सर्व प्रणालीला नियंत्रित करण्यासाठी एक नियंत्रण कक्षही असेल.
The post शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली ; फास्टॅगसह १३३ सीसीटीव्ही कॅमेरे appeared first on Loksatta.