विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणार होमवर्क आता बंद होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा होमवर्क घेणे हे पालकांसाठी जिकरीचे असते. अशावेळी होमवर्क बंद झाल्यास पालकांचा ताण कमी होऊ शकतो असे म्हटले जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
मुलांना ताण देऊ नये. त्यांच्या मेंदुचा विकास व्हायला दिला पाहीजे. होमवर्क ही टिचर्ससाठी पळवाट असू नये. आपण अर्धा तास जे शिकवतो ते एवढ एकाग्र होऊन शिकवलं पाहीजे की मुलांना होमवर्क करण्याची गरज लागू नये असे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले. हे माझे वैयक्तिक मत असून मी याविषयी शिक्षक संघटना, संस्था चालकांशी बोलून नंतर यावर निर्णय घेईन असे शालेय शिक्षणमंत्री म्हणाले.
दुसरीकडे होमवर्क नसेल तर विद्यार्थी घरी देखील अभ्यास करणार नाहीत. त्यामुळे या निर्णयाला विरोध देखील होण्याची शक्यता आहे. यावर पालक आणि तज्ञांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या