स्टार प्रवाह वाहिनीवरील नकुशी ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतील नकुशीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री “प्रसिद्धी किशोर आयलवार” हि नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. प्रसिद्धी किशोर या नावानेच ती फारशी ओळखली जाते. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुबई स्थित ओंकार वर्तक यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. ओंकार वर्तक यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. लग्नाचे काही खास फोटो प्रसिद्धीने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत. त्यावरून तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

नकुशी या मालिकेअगोदर प्रसिद्धीने ‘ते दोन दिवस’ या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. प्रसिद्धी आयलवार ही मूळची नागपूरची सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे आजोबा गजानन आयलवार हे संगीताचे प्राध्यापक होते. तिचे काका सुधीर आयलवार हे देखील सांस्कृतिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘रंगस्वानंद’ या संस्थेतून प्रसिद्धीला अभिनयाचे बाळकडू मिळत गेले. तर तिचे वडील किशोर आयलवार हे देखील रंगकर्मी म्हणून ओळखले जातात. प्रसिद्धीने भरतनाट्यमच्या तीन परीक्षा दिल्या आहेत याशिवाय पुण्यातील ललित कला केंद्र मधून तिने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘ते दोन दिवस’ या चित्रपटातून तिला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या चित्रपटानंतर उपेंद्र लिमये सोबत नकुशी या मालिकेतून ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. आम्ही दोघी, लक्ष्मी सदैव मंगलम या आणखी काही मालिकेतून तिने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले.

आमच्या ‘ही’ चं प्रकरण हे प्रसिद्धीने अभिनित केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक खूपच गाजलं होतं. देश विदेशात या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाचा वारसा लाभलेल्या प्रसिद्धीने हळूहळू मालिका क्षेत्रात आपला जम बसवला होता. नुकतीच प्रसिद्धीने ओंकार वर्तक सोबत लग्नगाठ बांधली असून तिच्या या बातमीवर सेलिब्रिटिकडून अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळीने देखील यांच्या लग्नाला हजेरी लागवल्याचे दिसून येते. सोशिअल मीडियावर देखील अनेक कलाकारांनी तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत तीच अभिनंदन केलं आहे. प्रसिद्धी आणि ओंकार या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा…