काल ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. ८ जानेवारी पासून लता मंगेशकर यांनी मृत्यूशी झुंज दिली होती. मात्र २७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. शनिवारी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे समजताच राज ठाकरे, अमिताभ बच्चन, रश्मी ठाकरे अशा बऱ्याच राजकीय तसेच कला विश्वातील लोकांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता दीदींची भेट घेतली होती. रविवारी संध्याकाळी शिवजीपार्क मैदानात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी देखील राजकारणातील बड्या बड्या नेत्यांनी, मंत्र्यांनी हजेरी लावून लता दिदींचे अंतिम दर्शन घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे

आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, अनिल देसाई, शरद पवार, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, शाहरुख खान यांनी लता दिदींच्या अंतिम दर्शनासाठी हजेरी लावून त्यांना अखेरचा निरोप दिला होता. मात्र या सर्वांमधून एकही मराठी कलाकार लता दिदींना निरोप देण्यासाठी किंवा त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावताना दिसला नाही या कारणास्तव मराठी कलाकारांवर टीकास्त्र सोडलेले पाहायला मिळत आहे. मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लता दिदींना श्रद्धांजली वाहिली असली तरी काही कलाकार मंडळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी तिथे हजर होते. मराठी कलाकारांवर होत असलेली टीका पाहून अभिनेत्री हेमांगी कवी हिने नुकतेच याबाबत खुलासा करत म्हटले आहे की, ‘ सरकारी प्रोटोकॉलस आड आले. मला गेट मधुन जाऊ दिले नाही. खूप विनंती केली. मला या गेट वरून त्या गेटवर जा म्हणत राहिले शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजित केळकर आम्ही ४ वाजल्यापासून तिथं होतो. शेवटपर्यंत आम्हाला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हते.

संगीताचे खरे वारसदार गायक शान, बेला शेंडे, शैलेंद्र सिंग, कविता पौडवाल यांनाही मागे हटकलं जात होतं, तिथे माझी काय गत! आम्ही तिथे कुणी सेलिब्रिटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हालाही शासकीय प्रोटोकॉल कळत होते म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हाला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं….’ त्यामुळे बऱ्याचशा मराठी कलाकारांना सरकारचे प्रोटोकॉल पाळावे लागले असल्याने त्यांनी शिवजीपार्कला जाण्याचे टाळले आहे असेच याबाबत म्हणावे लागेल. हेमांगी कवी प्रमाणे इतरही कलाकार तिथे उपस्थित होते ते आतमध्ये जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते मात्र केवळ सरकारच्या प्रोटोकॉलमुळे त्यांना लता दिदींचे अंतिम दर्शन घेता आले नाही अशी एक खंत हेमांगी कवीने व्यक्त केली आहे.