के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
मुंबई : बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रविवारी मुंबईत येणार आहेत. भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होणार आहे.
शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. ठाकरे यांच्या निमंत्रणानुसार राव हे रविवारी मुंबईत येणार असल्याची माहिती तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.
ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. राव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या लक्ष्यभेदी कारवाईच्या पुराव्याची मागणी राव यांनी अलीकडेच केली. तसेच भाजपच्या दडपशाहीविरोधात बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनीही राव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा जाहीर केला आहे. घटनेने दिलेले राज्यांचे अधिकार कायम राहावेत, या मागणीसाठी तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ठाकरे यांनी राव यांचे अभिनंदन करीत त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई भेटीत पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रादेशिक पक्षांची आघाडी?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट होत आहे. ममता आणि राव या दोन मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसशी फारसे जमत नाही. केरळचे मुख्यमंत्री विजयन हे भाजपच्या विरोधात असले तरी त्यांना अजून या आघाडीत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे.
The post बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न; के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला appeared first on Loksatta.