क्षयरोगबाधित बालकांमध्ये ४४ टक्के वाढ


|| शैलजा तिवले

मुंबई : मुंबईत चार वर्षांमध्ये बालकांमधील क्षयरोगाचे प्रमाण वाढले आहे. यात औषधांना दाद देणाऱ्या क्षयरोगासह (डीएस टीबी) औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाचे (ड्रग रेझिस्टंट- डीआर) प्रमाणही वाढत आहे. मागील चार वर्षांत हे प्रमाण सुमारे ४४ टक्क्यांनी वाढले आहे.

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. घरामध्ये कोणाला क्षयरोग झाल्यास बालकांना क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. त्यात एचआयव्हीबाधित, कुपोषित आणि रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घेत असलेल्या बालकांना तर क्षयरोगाची बाधा होण्याचा धोका जास्त असतो. मुंबईमध्ये क्षयरोग फोफावत असून बालकांमध्येही याची लागण होण्याचे प्रमाण २०१८ पासून वाढत असल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून निर्दशनास आले आहे. यातही डीआर क्षयरोगाच्या म्हणजेच एमडीआर आणि एक्सडीआर या प्रकारच्या क्षयरोगांची बाधा होण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढत असल्याचेही आढळले आहे.

२०१८ साली ४ हजार ३८९ बालकांना क्षयरोगाची लागण झाली होती. यामध्ये ३ हजार ९३६ बालकांना डीएस, तर ४५३ बालकांना डीआर क्षयरोगाची बाधा झाली होती. २०१९ मध्ये यात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ होऊन ४ हजार ४६२ वर गेली.

करोना काळात निदानामध्ये  २० टक्के घट

करोनाच्या साथीमुळे २०२० मध्ये मात्र एकूणच क्षयरोग निदानावर परिणाम झाला. त्यामुळे बालकांमधील क्षयरोग निदानावरही परिणाम झाला. या वर्षी बाधित बालकांच्या संख्येत सुमारे २० टक्क्यांनी घट झाली. २०२० मध्ये ३ हजार ५३३ बालकांचे निदान केले गेले. यात ३ हजार ९२१ बालकांना डीएस तर ४७६ बालकांना डीआर क्षयरोगाची बाधा झाली होती.

गतवर्षी बाधित बालकांमध्ये सुमारे ५२ टक्के वाढ

२०२१ मध्ये क्षयरोग निदानावर भर दिल्यामुळे २०२० मध्ये निदान न झालेल्या बालकांचे निदान केले गेले. परिणामी बाधित बालकांचे प्रमाण २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये सुमारे ५२ टक्क्यांनी वाढले. २०२१ मध्ये ५ हजार ४१९ बालकांना क्षयरोग असल्याचे निदान झाले. यामध्ये ४ हजार ७६३ बालकांना डीएस तर ६५६ बालकांना डीआर क्षयरोगाची बाधा झाल्याचे आढळले आहे.

हेही वाचा :  नरिमन पॉइंट-कफ परेड उन्नत मार्गासाठी निविदा; तीन महिन्यांत काम सुरू होणे अपेक्षित 

डीआर क्षयरोगाचे वाढते प्रमाण

बाधित बालकांपैकी डीआर क्षयरोग बाधित बालकांचे प्रमाण २०१८ साली सुमारे १० टक्के होते, तर २०१९ साली हे प्रमाण सुमारे १२ टक्क्यांवर गेले. २०२० मध्ये एकूण निदानावर परिणाम झाला असला तरी डीआर क्षयरोग बाधित बालकांचे प्रमाण हे १३ टक्क्यांवर गेले होते. २०२१ मध्ये बालकांचे निदान वाढल्यामुळे एकूण बाधित बालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बाधित बालकांच्या तुलनेत डीआर क्षयरोग बाधित बालकांचे प्रमाण घटून १२ टक्क्यांवर आले आहे. परंतु आकडेवारीमध्ये मात्र बरीच वाढ झाली आहे. २०१८ मध्ये डीआर क्षयरोग बाधित बालकांची संख्या ४५३ होती, तर २०२१ मध्ये ही संख्या ६५६ वर गेली आहे. त्यामुळे एकूण डीआर क्षयरोग बाधित बालकांच्या संख्येमध्ये सुमारे ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उपचार पूर्ण करणे आव्हानात्मक

मुंबईत बालकांमध्ये डीआर क्षयरोगाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये १० ते १२ टक्क्यांनी वाढले आहे. या क्षयरोगाच्या औषधोपचाराचा कालावधी जवळपास किमान १८ महिने आणि औषधांची संख्याही जास्त असल्यामुळे बालकांमध्ये उपचार पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक असते. एका वेळेस बालकांना किमान सात ते आठ गोळय़ा खाव्या लागतात. दररोज एवढय़ा गोळय़ा खाणे हे मुलांसाठी त्रासदायक असते. किशोरवयातील मुले औषधे घेण्यास तयार नसतात. त्यामुळे पालकांनाही बालकांवर उपचार पूर्ण करून घेणे अधिक कष्टदायक असते. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते आणि याचे रूपांतरण अनेकदा एमडीआर किंवा एक्सडीआरमध्ये होत असल्याचे वाडिया रुग्णालयातील बालरोग आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. इरा शाह यांनी सांगितले.

हेही वाचा :  चांदीवाल आयोगाचे नवाब मलिकांना समन्स; १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

डीआर क्षयरोगाच्या औषधांचे दुष्परिणाम

मोठय़ांप्रमाणे बालकांमध्ये एमडीआर आणि एक्सडीआरचे उपचार सुरू असताना औषधांचे दुष्परिणाम आढळतात. इतर परिणामांसह बालकांमध्ये श्रवणसंस्थेवर परिणाम होत असल्याचे काही ठिकाणी आढळले आहे. बालकांमध्ये हे दुष्परिणाम हाताळणे अधिक अवघड असते. अगदी लहान बालकांना सांगताही येत नसल्यामुळे दुष्परिणाम ओळखणेही अनेकदा अवघड असते. बालकांना तोंडाद्वारे घ्यायची औषधे त्याच्या वयाला पूरक अशा मात्रेमध्ये मुंबईत उपलब्ध होत असली तरी राज्यभरात सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही वेळा मोठय़ांच्या औषधांचे विभाजन करून त्यांच्या मात्रेमध्ये द्यावी लागतात. तसेच नव्याने आलेली डेलामनाईड हे औषधही अगदी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे याचा वापरही अधिक काटेकोरपणा करावा लागतो.

जनजागृतीवर भर

गेल्या काही वर्षांमध्ये बालकांमधील क्षयरोगाचे प्रमाण निश्चितच वाढत आहे. या मागील कारणे शोधण्यासाठी आता स्वतंत्र अभ्यास केला जात आहे. घरातील प्रौढ व्यक्तीला बाधा झाल्यास बालकांना आयपीटी पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दिले जाते. परंतु पालक बऱ्याचदा त्यांच्या फॅमिली डॉक्टर किंवा बालरोगतज्ज्ञांना याच्या वापराबाबत विचारणा करतात. हे डॉ़क्टर याचा वापर न करण्याचा सल्ला देत असल्यामुळे आयपीटीची वापर फारसा केला जात नाही. आयपीटी वापराबाबत जनजागृतीसाठी प्रत्येक विभागांना त्यांच्या क्षेत्रातील बालरोगतज्ज्ञ आणि फॅमिली डॉक्टर यांच्या कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले आहेत. आयपीटी घेण्याचे फायदे आणि आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे पालिकेच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रभावी वापर आवश्यक

घरामध्ये प्रौढ व्यक्तीला क्षयरोगाची लागण झाली असल्यास बालकांना याची लागण होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी औषधोपचारही उपलब्ध आहेत. या उपचारांना आयसोनियाझिड प्रिव्हेन्टिव्ह थेरपी (आयपीटी) म्हटले जाते. हे उपचार सहा महिने दररोज घ्यावे लागतात; परंतु प्रौढांना लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या तपासण्या तत्परतेने केल्या जात नाहीत. तसेच बालकांना प्रतिबंधात्मक उपचारही सुरू केले जात नाहीत. त्यामुळे बालकांनाही यांच्यामार्फत बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बालकांना सहा महिन्यांसाठीची प्रतिबंधात्मक औषधे लवकरात लवकर सुरू केल्यास क्षयरोगाची लागण होणार नाही, असे मत संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. तनु सिंघल यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :  समान निधी वाटपाची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बालकांमध्ये क्षयरोगाची लक्षणे

  दोन आठवडय़ांहून अधिक काळ खोकला किंवा ताप येणे

  वजन न वाढणे किंवा कमी होणे

  खाण्याची इच्छा नसणे

  डोकेदुखी, पाठदुखी, उलटय़ा होणे

  लिम्फनोडला सूज येणे

  रात्रीच्या वेळी घाम येणे

फुप्फुसांव्यतिरिक्त अन्य अवयवांचा क्षयरोग

मागील काही वर्षांमध्ये बालकांमध्ये फुप्फुसांव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागांमध्ये (एक्स्ट्रा पल्मनरी) क्षयरोगाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या क्षयरोगाची लागण झालेल्या बालकांमध्ये ६६ टक्के जणांना एक्स्ट्रा पल्मनरी क्षयरोगाची बाधा होत असून उर्वरित बालकांमध्ये फुप्फुसांचा क्षयरोग आढळत आहे. यामध्ये मेंदू, हाडे, लिम्फनोड, पोटाचा हे क्षयरोगाचे प्रकार प्रामुख्याने आढळत आहेत, असे डॉ. शाह यांनी सांगितले.

या बालकांना आयपीटी सुरू करणे गरजेचे

खालील गटातील बालकांना क्षयरोगाची बाधा होण्याचा धोका अधिक असल्यामुळे आयटीपी सुरू करणे गरजेचे आहे.

फुप्फुसाचा टीबी असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सहा वर्षांखालील बालके

सर्व एचआयव्हीबाधित बालके

रोगप्रतिकारशक्ती कमी होणारी औषधे घेत असलेली बालके

गर्भधारणेदरम्यान टीबीचे निदान झालेल्या मातेला झालेली मुले

The post क्षयरोगबाधित बालकांमध्ये ४४ टक्के वाढ appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …