राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये यंदा वेळ वाढवून देण्यात आला आहे. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना तब्बल पाच तास परीक्षा केंद्रावर थांबावे लागणार आहे. तसेच दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांचे पेपर संपण्यास सायंकाळचे सात वाजणार असल्यामुळे, परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्यांची चांगलीच कसरत होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रत्येक पेपरला अर्धा तास वेळ अधिक दिला जातो. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेदरम्यान शंभर गुणांच्या पेपरसाठी साडे तीन तास वेळ असतो. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे परीक्षाच झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदा सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंडळामार्फत घेण्यात आला असून, हा निर्णय दिव्यांग विद्यार्थ्यांनाही लागू असणार आहे. परिणामी, दिव्यांग विद्यार्थ्यांना शंभर गुणांच्या पेपरसाठी यंदा एक तास वाढीव मिळणार आहे. परंतु, यामुळे विद्यार्थ्यांना जवळपास पाच तास परीक्षा हॉलमध्ये थांबावे लागणार आहे. यावर पर्याय शोधण्याची मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत केली जात आहे.
…असे आहेत नियम
परीक्षेसाठी एका वर्गात केवळ २५ विद्यार्थ्यांना बसण्यास परवानगी असून, वेळेत परीक्षा पूर्ण करण्यासाठी यंदा दोन सत्रात दहावीच्या परीक्षा होणार आहेत.
परीक्षेपूर्वी एक ते दीड तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे असल्याने ३ वाजेच्या पेपरसाठी २ वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर यावे लागणार आहे.
यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना २ वाजेपासून पेपर संपेपर्यंत म्हणजेच सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर थांबावे लागणार आहे.
१०० गुणांच्या प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांना ही कसरत करावी लागणार आहे.
मंडळाने पर्याय शोधावा
सायंकाळी सात वाजता परीक्षा संपल्यानंतर शहरातील विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास किमान पंधरा मिनिटे ते अर्धा तास लागणार आहे. याचसोबत पंधरा पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या आदिवासी भागातील शाळांना दुसऱ्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना रात्रीच्या प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात. तसेच त्यांच्या पालकांनाही इतका वेळ परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे राहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाने यावर पर्याय शोधण्याची मागणी मुख्याध्यापक संघामार्फत केली जात आहे. परीक्षा लवकर सुरू करा किंवा परीक्षेचा कालावधी कमी करा, अशी मागणी या संघटनेमार्फत केली जात आहे.
पाच तास एकाच ठिकाणी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अनेक अडचणी असतात. त्या समजून घेऊन यावर तोडगा काढायला हवा. परीक्षा सुरळीत आणि विद्यार्थ्यांना कोणताही त्रास न होता पार पाडणे आवश्यक आहे.
– एस. बी. देशमुख, सचिव, राज्य मुख्याध्यापक संघ