आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी (SSC HSC Exam 2022) विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक नसल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी स्पष्ट केले. लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पालकांच्या संमतीनुसार लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही राज्य मंडळाने केले आहे.
राज्यामध्ये काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेण्याची सक्ती होत आहे. त्या संदर्भातील अनेक तक्रारी राज्य मंडळाकडे दाखल झाल्या आहेत. त्यांवर स्पष्टीकरण देताना लसीकरण बंधनकारक नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी लसीकरणासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे. कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अशा सूचना संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
राज्यामध्ये १५ ते १८ वयोगटातील ६५ ते ७० टक्के मुलांचे लशीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित मुलांचे लसीकरण विभाग पातळीवर पूर्ण केले जात आहे. सध्या राज्यात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण थंडावले आहे. लशींचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपर्यंत दोन्ही लस घेणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन परीक्षेसाठी लसीकरण बंधनकारक असल्याची घालण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.