नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढण्याबरोबरच त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज आज फेटाळला. संतोष परब हल्ल्याप्रकरणी गोट्या सावंत संशयित आरोपी आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी गोट्या सावंत यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जामीन अर्ज फेटाळला असला तरी गोट्या सावंत यांना अटकेपासून १० दिवसांच संरक्षण दिलं आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, मात्र त्यांना या कालावधीत स्वतः दिवाणी न्यायालयात हजर व्हावं लागेल, असं न्यायालयाने स्पष्ट केल्याची माहिती त्यांचे वकील वकील राजेंद्र रावराणे यांनी दिलीय.
सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता. न्यायालयाने संदेश सावंत यांना दहा दिवसाचा प्रोटेक्शन कालावधी दिलेलं आहे. या दहा दिवसात त्यांनी ट्रायल कोर्टात जाऊन स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा आहे. त्यांना १० दिवसाचे संरक्षण असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, असं रावराणे म्हणालेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही ट्रायल कोर्टामध्ये स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये असेल त्याप्रमाणे जामीन अर्जावर निर्णय घ्यायचा. जशी न्यायालयीन प्रक्रिया आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात झाली तशीच प्रक्रिया सावंत यांच्या संदर्भात असल्याचं सांगण्यात आलंय.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्येच गोट्या सावंत यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.१८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.
या नोटीसीनंतर आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, राकेश परब आदिनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता. या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला. मुंबई उच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आमदार राणे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते तोपर्यंत दहा दिवस त्यांना अटकेपासून सवलत देणारे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर नितेश राणे मागील आठवड्यात न्यायालयासमोर शरण आले. त्यांना सध्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नितेश राणेंना कोल्हापूरला हलवलं…
सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.