शिवमोग्गा शहरातील कर्नाटक पब्लिक स्कूलमधील (Karnataka Public School) अनेक विद्यार्थिनींनी दहावीच्या प्राथमिक परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. शाळेतील विद्यार्थिनी हिना कौसरने सांगितले की, मला शाळेत प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगितले होते. मी ते करू शकत नाही, म्हणून मी परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही अनेक विद्यार्थीनींनी असेच केल्याचे ती म्हणाली.
दुसरीकडे उडपीच्या पाकीरनगरमधील अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. पकीरनगर येथील सरकारी उर्दू शाळेतील विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, शाळेत हिजाब घालण्यास बंदी असल्याने मी तिला शाळेत पाठवत नाही. आत्तापर्यंत आमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी हिजाब घालून या शाळेत शिक्षण घेतले आहे. मग अचानक नियम का बदलले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, उडुपी जिल्ह्यातील कापू तालुक्यातील पाकीरनगर येथील सरकारी उर्दू शाळेमध्ये हिजाब वादाच्या प्रश्नाबाबत पालक आणि शिक्षकांमध्ये बैठक सुरू आहे. हिजाब परिधान करुन आलेल्या विद्यार्थीनींना वेगळ्या खोलीत बसण्याची व्यवस्था करावी असे यावेळी स्थानिक तहसीलदारांनी सांगितले. पण हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना वेगळ्या खोलीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील शाळा १४ फेब्रुवारी सुरु झाल्या आहेत. तसेच महाविद्यलये देखील सुरु करण्याचा निर्णय कर्नाटक शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
महाविद्यालयांसाठी सूचना
ज्युनिअर कॉलेज आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कॉलेज डेव्हलपमेंट बोर्डाने (CDC) सुचवलेल्या ड्रेस कोडचे पालन करावे. विद्यार्थ्यांनी समानता, अखंडता आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे कपडे परिधान करावेत असे निर्देशांमध्ये म्हटले आहे.
काय आहे वाद?
जानेवारीमध्ये कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला होता. येथील ज्युनिअर कॉलेजमधील सहा विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. ड्रेसमध्ये समानता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. हिजाबच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी भगवी शाल परिधान करून शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचू लागले. त्यानंतर हा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.