देवमाणूस मालिकेचा पहिला भाग जेव्हा संपला तेव्हा डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंग मरत असल्याचे दाखवण्यात आले होते, मात्र त्याचा मृतदेह न दाखवल्याने प्रेक्षकांना या मालिकेचा दुसरा भाग येणार याचा अंदाज आला. पहिल्या पर्वाच्या यशानंतर काही महिन्यातच देवमाणूसचा दुसरा सीझन आला. दुसऱ्या भागात डॉ. अजितकुमार राजस्थानमधून नटवरलाल बनून गावात आल्याचं दाखवण्यात आलं. पुन्हा एकदा नटवरचा तोच खेळ सुरू झाला. ज्यामध्ये त्याने पुन्हा महिलांचे खून केले.
पहिल्या भागात इन्स्पेक्टर दिव्या सिंगकडून देवमाणसाचा खेळ खल्लास होईल असं वाटत होतं पण दिव्याला काही त्यानं थांग लागू दिला नाही. पण दुसऱ्या भागात इन्स्पेक्टर जामकरच्या जाळ्यात तो अडकला. त्यात डिंपलशी डॉक्टरचं लग्न झाल्यानंतर तिलाही त्याचं वागणं असह्य झालं. आई होणार असलेल्या डिंपलने डॉक्टरच्या विरोधात साक्ष दिली आणि अखेर डॉक्टरला फाशी झाली.
आता देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग येणार असल्याची चर्चा सोशलमीडियावर रंगली आहे. मालिकेच्या निर्माती श्वेता शिंदे हिने याबाबत काहीच जाहीर केलेलं नाही. किंवा कलाकारांकडूनही याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र जर देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग आला तर फाशी दिलेला डॉ. अजितकुमार, उर्फ नटवर कसा परत येणार हा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनात डोकावत आहे. अर्थात याचं उत्तर जर या मालिकेचा तिसरा भाग आला तरच मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील डॉ. संतोष पोळ याने केलेल्या खुनाचं सत्र खूप गाजलं. अजूनही डॉ. पोळ याची कोर्ट सुनावणी सुरू आहे. डॉ, पोळ याच्या जीवनाशी साधर्म्य असलेली देवमाणूस ही मालिका दोन वर्षापूर्वी मराठी छोट्या पडदयावर दाखल झाली. डिंपल, बाबू काका, मंगलताई, सरू आजी, टोन्या, रूपा, बज्या, नाम्या, मंजू, विजयभाऊ, रेश्मा, अपर्णा, इन्स्पेक्टर दिव्या सिंग, वकील आर्या ही पात्रं तुफान लोकप्रिय झाली. डॉ. अजितकुमार देव याच्या भूमिकेत किरण गायकवाड याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. प्रमुख भूमिकेतील किरणचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. या मालिकेतील सरूआजीच्या शिव्यांनी तर खूपच प्रसिध्दी मिळवली.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या