७१ वर्षीय सेनगुप्ता दीर्घकाळ करोनाशी झुंज देत होते.
भारताचे माजी मिडफिल्डर आणि पश्चिम बंगालचे माजी फुटबॉलपटू सुरजित सेनगुप्ता यांचे निधन झाले आहे. ७१ वर्षीय सेनगुप्ता दीर्घकाळ करोनाशी झुंज देत होते. १९७०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा ते भाग होते. सेनगुप्ता १९७० ते १९७६ दरम्यान सलग सहा वेळा कोलकाता फुटबॉल लीगचे विजेतेपद जिंकणाऱ्या ईस्ट बंगाल संघाचे भाग होते.
सेनगुप्ता यांनी सहा वेळा आयएफए शिल्ड आणि तीन वेळा ड्युरंड कप जिंकला होता. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. सुरजित सेनगुप्ता यांच्या निधनाने बंगालच्या क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – IPL ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरल्यानंतर इशांत शर्मानं घेतला ‘मोठा’ निर्णय!
सुरजित सेनगुप्ता यांचा जन्म ३० ऑगस्ट १९५१ रोजी हुगळी जिल्ह्यातील चुचुंदा येथे झाला. किडरपोर क्लबमधून त्यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक शानदार सामने खेळले. १९७५शील्ड फायनलमध्ये त्य़ांनी मोहन बागानविरुद्ध ईस्ट बंगालसाठी पहिला गोल केला. १९७९ शील्ड सेमीफायनलमध्ये त्यांनी थायलंड विद्यापीठाविरुद्ध शानदार गोल केला.
कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सेनगुप्ता यांना २३ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.