आजच्या सामन्याला सुरुवात झाली तीच शेफालीच्या दणकेबाज फटकेबाजीने. सुरुवातीपासूनच शेफालीने बांगलादेशच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. शेफालीने या सामन्यात ४४ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची दमदार खेळी साकारली. शेफालीने यावेळी स्मृती मंधानाबरोबर ९६ धावांची भागीदारी रचली. शेफालीने यावेळी या अर्धशतकासह एक पराक्रम केला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी वयात एक हजार धावा करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. यापूर्वी ही विक्रम स्मृतीच्या नावावर होता. स्मृतीने २१व्या वर्षा भारतासाठी खेळताना एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या, पण आता १८व्या वर्षी शेफालीने एक हजार धावा पूर्ण केल्या असून आता हा विक्रम तिच्या नावावर असेल.
शेफाली आणि स्मृती यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करत असताना १५९ धावा करता आल्या. शेफालीनंतर स्मृतीने ४७ आणि जेमिमा रॉड्रीग्सने नाबाद ३५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या पहिल्या तीन फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली आणि त्यामुळे भारताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला.
भारताच्या १६० धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात आश्वासक झाली नाही. बांगलादेशच्या मधल्या फळीतील फलंदाजांना यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. बांगलादेशचे पहिले तीन फलंदाज सोडले तर त्यानंतर एकाही खेळाडूला दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. हेच बांगलादेशच्या पराभवाचे मोठे कारण ठरले. पण त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. भारताने ठराविक फरकाने बांगलादेशच्या संघाला एकामागून एक धक्के दिले आणि त्यामुळेच त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना १०० धावा करता आल्या आणि भारताेन ५९ धावांनी दणदणीत विजय साकारला.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या