लता मंगेशकर हे नाव आज भारतीय संगीतक्षेत्रात माईलस्टोन होत्या. असा आवाज होणे नाही असं म्हणत लतादीदींनी संगीतविश्वात गारूड केलं आहे. आजवरच्या या यशस्वी प्रवासात मात्र लतादीदींना अनेक चढउतार, खाचखळगे, अपमान झेलावे लागले आहेत. खरंतर लतादीदी शाळेत कधीच केल्या नाहीत वर्गात बसून त्यांना शिक्षणही घेतलं नाही पण वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांच्या आयुष्यात आघात करणारे असे काही क्षण आले की शाळेत न जाताही लतादीदींनी जे धडे गिरवले त्यातूनच त्या घडत गेल्या. लतादीदींच्या आयुष्यातील ही शाळा नेमकी कोणती होती हे त्यांनी काही आठवणीतून सांगितलं. दीनानाथ मंगेशकर यांच्यारूपाने असलेला वडिलांचा आधार गेल्यानंतर भावंडातील मोठय़ा म्हणून लतादीदींनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांदय़ावर घेतली पण तेच खांदे मजबूत ठेवण्यासाठी दीदींनी त्यांच्या लहानपणातील अनेक कोवळे क्षण लोकांच्या बोलण्याने झालेल्या आघातांनी पचवले आहेत.

खरंतर माणुसकी, भूतदया, संवेदनशीलता या संस्कारातच मंगेशकर कुटुंबात दीदींच्या वयाची बारा वर्षे सुखात गेली. पण जेव्हा बाबा गेले आणि घर चालवण्यासाठी दीदी समाज नावाच्या शाळेत वावरायला लागल्या तेव्हा व्यवहाराची भाषा, नियमांचे बोल सांगून अनेकांनी दीदींना मानसिक त्रास दिला. पण कष्टाची तयारी, परिस्थितीची जाणीव आणि आईवडीलांचे संस्कार यामुळे त्यांनी बोलून उत्तर देण्यापेक्षा कृतीतूनच उत्तर दिले. लतादीदी जेव्हा लहानपणातील मनावर व्रणासारख्या कोरलेल्या घटना सांगायच्या तेव्हा लतादीदीनी संघर्षवाट तुडवत गाठलेले यश खूप काही बोलून जायचे. बाळला पोलिओ अन वेदना दीदींना – कोल्हापुरातील मंगळवार पेठेत खरी कॉर्नरला आनंदराव मेस्त्री यांच्या घराशेजारील एक घर लतादीदींनी 15 रूपये महिना भाडय़ाने घेतलं. आशा, उषा, मीना , हृदयनाथ आणि माईंसोबत लतादीदींनी कोल्हापुरात बिरहाड थाटलं. रोज सायकलने त्या मास्टर विनायक यांच्या शालीनी स्टुडिओमधील कंपनीत कामासाठी जायच्या. खरंतर पगार इतका तोकडा होता की 15 रूपये भाडे देतानाही खूप कसरत करावी लागायची. मीना, आशा व उषा यांनी विदयापीठ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला तर हृदयनाथांचे वय अजून शाळेत जाण्याचे नव्हते शिवाय त्यांना पोलिओ झाल्याने सतत त्यांच्या पायातून पू येत असते. गल्लीत मुलं तेव्हा लपंडाव खेळायची. त्या खेळात हृदयनाथ सगळय़ात आधी सापडायचे.

ते कुठे लपून बसलेत हे कळायला वेळ का लागायचा नाही याचे कारण जेव्हा इतर मुलांकडून लतादीदींना समजले तेव्हा आपण बाळ म्हणजे हृदयनाथावर उपचारही करू शकत नाही याची खूप मोठे दु:ख लतादीदींना झाले होते. खेळणारी मुलं दीदींना म्हणाली, बाळच्या पोलिओ झालेल्या पायातून वाहणारा पू जिथेपर्यंत जमीनीवर सांडत जातो ना, आम्ही तिथे बाळचा माग काढतो आणि बाळ कुठे लपलाय हे आम्हाला लगेच कळतं. बाळच्या पायातील पू, त्याचा पोलिओ, औषधोपचारालाही पैसे नसल्याचे शल्य याचा फार मोठा परिणाम लतादीदींच्या मनावर झाला. फी भरली नाही म्हणून….विदय़ापीठ हायस्कूलमधून उषा व मीना यांचे नाव कमी केल्याचा निरोप माईंना पाठवला. लतादीदी शाळेत विचारायला गेल्या तेव्हा फी भरली नसल्याने त्यांचे नाव कमी केल्याचे सांगितले. लतादीदी काही न बोलता तेथून आल्या. मागे काही वर्षापूर्वी विदय़ापीठ हायस्कूलच्या निधीसाठी शाळेच्या व्यवस्थापनाने लतादीदींशी संपर्क केला होता तेव्हा लतादीदींनी शाळा व्यवस्थापनाला त्या दिवसाची आठवण करून दिली. दीदींनी निधी दिला पण आजही त्या वर्षाचे रेकॉर्ड काढून बघा जिथे फी भरली नसल्याने माझ्या बहिणींचे नाव कमी करत असल्याची नोेंद असल्याचे दाखवून दिले. मीना व उषा यांचे शिक्षण थांबल्याचा तो दिवस दीदी विसरू शकल्या नाहीत.