उमेश यादवने गेल्या पाच महिन्यांत लीग क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी उमेश यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शमीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने उमेशला ही संधी मिळाली आहे. उमेशला गेल्या काही वर्षात केवळ टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळते आहे, त्यातही ठराविक अंतराने त्याचा भारतीय संघात समावेश होतो आहे. पण आता टी ट्वेन्टी संघात त्याचं परतणं ही निश्चित उमेशसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट असेल.
आयपीएलमध्ये जलवा
उमेश यादवच्या पुनरागमनामागचे मोठे कारण म्हणजे त्याची अलीकडच्या काही महिन्यांतील कामगिरी. या वर्षी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यापासून उमेशने आपला दबदबा निर्माण केला. विशेषत: पॉवरप्लेमध्ये तो वेग आणि स्विंगच्या जोरावर विकेट घेत होता. त्याने कोलकात्याकडून १२ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या.
आगामी टी २० विश्वचषकासाठी शमीची भारताच्या पंधरा सदस्यीय संघात निवड झाली नाहीये. त्याची निवड न झाल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं. त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी ट्वेन्टी मालिका सुरु होण्यापूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याने तो टी ट्वेन्टी मालिकेत खेळणार की याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
इंग्लंडमध्येही दबदबा
उमेशने गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना आपली चमक दाखवली. रॉयल लंडन एकदिवसीय चषक स्पर्धेत उमेशने मिडलसेक्ससाठी केवळ ७ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आणि तो संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली, त्यानंतर तो भारतात परतला.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या