मंत्र्यांच्या घोषणेनंतरही विद्यार्थ्यांची गैरसोय
नागपूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी २१ जानेवारीला ट्विटरवर वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली असली तरी १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होऊन अद्यापही शासकीय वसतिगृहे मात्र बंद आहेत. वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थी महाविद्यालय सुरू होऊनही शहरात येऊ शकलेले नाहीत. दारिद्र्यरेषेखालील हजारो विद्यार्थ्यांवर भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी तातडीने शासकीय वसतिगृह सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.
गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृह हा एकमेव आधार असतो. राज्यातील ४४३ वसतिगृहात एकूण सध्या ४० हजारांच्या जवळपास मुले-मुली लाभ घेत आहेत. मात्र, टाळेबंदी काळात विद्यार्थ्यांना शासनाची कोणतीही मदत झाली नाही. आता धनंजय मुंडे यांनी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केल्याने विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयांबरोबर वसतिगृहेही लवकरच सुरू करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, लवकरात लवकर वसतिगृह सुरू करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
…तर स्वाधार योजना लागू करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळते, त्यांचा कुठलाही हप्ता स्थगित झालेला नाही. त्यामुळे ते त्यांचा खर्च करून शिक्षण घेत आहेत. त्याप्रमाणे शासनाने वसतिगृहातील मुलांनादेखील वार्षिक खर्च देऊन पात्र ठरवावे. राज्य सरकारने वसतिगृह तातडीने सुरू करावे किंवा मुलांचा वार्षिक खर्च द्यावा, अशी मागणी मानव अधिकार संरक्षण मंचचे सदस्य आशीष फुलझेले यांनी केली आहे.
शंभर टक्के वसतिगृहे सुरू होण्यासंदर्भात परवानगी दिली आहे. कुठल्याही भागातील वसतिगृह बंद नाहीत. मात्र, अशी कुठली तक्रार असेल तर विद्यार्थ्यांनी सांगावे लगेच वसतिगृह सुरू करायला सांगितले जाईल. – धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय.
The post राज्यातील शासकीय वसतिगृहे बंदच; मंत्र्यांच्या घोषणेनंतरही विद्यार्थ्यांची गैरसोय appeared first on Loksatta.