
सेना-राष्ट्रवादीतील वाद विकोपाला
महाआघाडीच्या स्थापनेपासूनच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरूच आहेत. आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतरही शिवसेना आमदारांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत दोन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन, एकत्रित येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता. पालकमंत्री आदिती तटकरे यांना जिल्ह्याचा कारभार पाहताना शिवसेना आमदारांना विश्वासात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर काही दिवस सगळे काही सुरळीत सुरू असल्याचे जाणवत होते. जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले. जल जीवन मिशनच्या योजनांवरून दोन्ही पक्षांत वादाची ठिणगी पडली. यावर नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेशी जुळवून घेण्यास नकार दिला. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. राष्ट्रवादीने शेकापशी आघाडी करून त्यांनी माणगाव, पालीची निवडणूक लढवली, तळा नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा पराभव केला. माणगावमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले. यामुळे दोन्ही पक्षांतील वाद अधिकच विकोपाला गेले. खासदार सुनील तटकरेंनी शिवसेनेवर जाहीर टीका केली. त्यामुळे शिवसेनेचे तिन्ही आमदार आता तटकरेंविरोधात एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माणगाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परीषद घेऊन थेट पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे.
पालकमंत्री तटकरे मनमानी पद्धतीने कारभार करत असून शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात लुडबुड करत आहेत. परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करत आहोत.
– भरत गोगावले, आमदार
The post रायगडच्या पालकमंत्री बदलण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; सेना-राष्ट्रवादीतील वाद विकोपाला appeared first on Loksatta.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
