दुबई, 28 ऑगस्ट: आशिया चषकातला भारत आणि पाकिस्तान संघातला महामुकाबला आता अवघ्या काही वेळात सुरु होणार आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. पण या सामन्यासाठी टीम इंडियानं चक्क रिषभ पंतला विश्रांती देत दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग
भारताचं पारडं जड?
आशिया चषकासाठी दुबईत दाखल झालेली टीम इंडिया सलामीच्या लढतीसाठी सज्ज झाली आहे. कर्णधार रोहितसह लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, आणि हार्दिक पंड्या अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. गोलंदाजीत बुमरा आणि शमीची उणीवर जाणवणारी असली तरी भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल हे अनुभवी गोलंदाज भारतीय संघात आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्यु. या दोन वेगवान गोलंदाजांशिवाय पाकिस्तान मैदानात उतरणार आहे. त्यामुळे अनुभवी हसन अली आणि शादाब खानसह नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन या युवा गोलंदाजांवर पाकिस्तानचं आक्रमण अवलंबून असेल. पण फलंदाजीत मात्र बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावरच पाकची मदार राहिल. आंतरराष्ट्रीय टी20 रँकिंगमध्ये बाबर आझम पहिल्या नंबरवर तर रिझवान तिसऱ्या नंबरवन आहे.
विराटचा शतकी सामना
दरम्यान सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याच सामन्यात विराटच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. आजवरच्या कारकीर्दीत विराटनं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यात आज आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. विराट कोहलीनं आतापर्यंत 99 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत-पाक संघांमधला सामना हा विराटच्या कारकीर्दीतला शंभरावा सामना आहे. शंभर आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा विराट हा भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरणार आहे. विराटच्या आधी रोहित शर्मानं आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेले आहेत.
तिन्ही फॉरमॅटमध्ये सामन्यांचं ‘शतक’
दरम्यान दुबईतला हा सामना पकडून विराटनं भारताकडून खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये शंभर सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराटनं 100 टी20, 102 कसोटी आणि 262 वन डेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asia cup, Cricket, India vs Pakistan
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या