
ठाणे : महापालिका सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी केलेल्या भाषणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. असे असतानाच कळवा भागातील रस्त्यावर एक खड्डा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
कळवा येथील विटावा भागात महापालिकेच्यावतीने उभारलेल्या दिवंगत मुकुंद केणी क्रीडा संकुलाचे लोकार्पण गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. “कळव्यातील प्रत्येक झोपडपट्टीत काँक्रीटीकरणाचे रस्ते आहेत. अशी चांगली कामे करून कळवा वासीयांच्या हदयात स्थान मिळवण्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केले आहे. कुठलीही अडचण असो येथील नगरसेवक चोवीस तास नागरिकांसोबत उभा असतो, याचा मला अभिमान आहे. तसेच आमचे नगरसेवक चांगले काम करीत असल्यामुळे कधीही निवडणूक आल्या तरी चार ते पाच पॅनल डोळे झाकून निवडून येतील,” असा दावाही त्यांनी केला.
“राजकारणात एक इंच जरी पाय हवेत गेला तर तुम्हाला वारा वर घेऊन जाईल. राजकारणातील वारा हा सुसाट असतो आणि तो कधी दिशा बदले हे ही सांगता येत नाही. राजकारण हे असुरक्षित आहे. राजकारणात अस्थिरता झोपून देत नाही, असेही ते म्हणाले. एकीकडे शहरात मोकळे भूखंड शिल्लक रहात नसतानाही स्व. मुकूंद केणी यांनी या भूखंडावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी दाखविलेले हे स्वप्न पूर्ण होत आहे. मुकूंद केणी यांनी या क्रीडा संकुलाची सुरुवात केली होती. त्यांचे हे स्वप्न मंदार केणी यांनी पूर्ण केले आहे. या क्रीडा संकुलासारखे दुसरे क्रीडा संकुल संपुर्ण ठाणे शहरात दिसणार नाही. राष्ट्रवादीचे नगरसेवक समर्पित भावनेने काम करीत असल्यानेच आपण कळवा- मुंब्रा बदलतोय, असे म्हणत आहोत,” असेही ते म्हणाले.
विटावा भागात महापालिकेच्यावतीने उभारलेल्या दिवंगत मुकुंद केणी क्रीडा संकुलामध्ये फूटबॉल, क्रिकेट, कब्बडी यांचे टर्फ, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जीम अशा सर्व सुविधा आहेत.
The post “कळव्यातील रस्त्यांवर खड्डे दाखवा, एक लाख मिळवा;” जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला टोला appeared first on Loksatta.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या