पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीत सहा हजार ७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. चार हजार २८५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना उद्या, शनिवारपर्यंत (दि. १७) कॉलेजात जाऊन कागदपत्रे आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे.
६८ हजारांना प्रवेश
केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एक लाख ११ हजार २३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ९४ हजार ८२७ जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि एका विशेष फेरीद्वारे ६८ हजार १५९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.
दुसऱ्या फेरीत ९ हजारांचा सहभाग
अकरावीला अद्याप प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी आणि एटीकेटी सवलतप्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश गुरुवारी जाहीर करण्यात आले. दुसऱ्या विशेष फेरीत ९ हजार ४१५ विद्यार्थी सहभागी झाले. त्यातील ६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला, तर २ हजार ६७८ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला नाही.
वेबसाइटवर संपर्क साधा
प्रवेश जाहीर झालेल्यांपैकी ४ हजार २८५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १ हजार १३४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, ५०४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. यातील चार हजार २८५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्याने, त्यांना प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. विद्यार्थी-पालकांनी अधिक माहितीसाठी https://pune.11thadmission.org.in/ या वेबसाइटवर संपर्क साधावा. या कालावधीत कोटांतर्गत प्रवेश प्रक्रियाही सुरू राहणार असल्याचे समितीकडून कळवण्यात आले आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या