सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल


देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबई : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कारवायांना पैसे पुरविल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, सरकार पडण्याच्या भीतीपोटीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही, असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का, असा सवाल बुधवारी केला.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजपने मुंबईत आझाद मैदानापासून मेट्रो चित्रपटगृहापर्यंत मोर्चा काढला़. फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार आणि पक्षाचे खासदार-आमदार व अन्य पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनी मोर्चा अडवून भाजप नेत्यांना ताब्यात घेतले आणि यलोगेट पोलीस ठाण्यात नेले. तिथेही या नेत्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. काही वेळाने या नेत्यांना पोलिसांनी सोडून दिले.

आझाद मैदानावर  झालेल्या जाहीर सभेत मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर फडणवीस यांनी सडकून टीका केली. हा संघर्ष मुंबईसाठी नसून, कुख्यात दाऊदचे हस्तक आणि देशद्रोह्यांविरोधात असल्याचे फडणवीस म्हणाल़े. ‘‘तुम्हाला तुमचे सरकार लखलाभ. आम्हाला सरकार नको. मुंबईच्या चिंधडय़ा उडविणाऱ्यांशी संबंध असलेला मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात का होता, असा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांनी केल्यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?’’ असा सवाल फडणवीस यांनी केला. मलिक यांचा राजीनामा घेईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, ते झुकणारे किंवा वाकणारे नाहीत, असे फडणवीस म्हणाल़े

हेही वाचा :  यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर छापा; मुंबईत ३३ ठिकाणी शोधमोहीम

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शहावली खान हा बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार याकूब मेमनसह बॉम्बस्फोट कट, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात सहभागी होता. सलीम पटेलही दाऊदची बहीण हसीना पारकरचा साथीदार होता. बनावट कुलमुखत्यारपत्राचा वापर करून मलिक यांनी सुमारे दोन हजार रुपये चौ. फूट दराची सुमारे तीन एकर जागा फक्त २५ रुपये चौ. फूट दराने विकत घेतली आणि १५ रुपये दराने पैसे दिले. मुंबईत उकीरडय़ाची जागाही या दराने मिळत नाही. दाऊदच्या हस्तकांकरवी जमिनींचे व्यवहार करून मिळविलेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

हे व्यवहार करताना मलिक यांना लाज कशी वाटली नाही? ज्या मुंबईकरांच्या बॉम्बस्फोटात चिंधडय़ा उडाल्या, घरदार उद्ध्वस्त झाले, त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे का झालात, असा सवाल फडणवीस यांनी केला. विरोधकांना संपविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सरकारी व पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून कटकारस्थाने रचत आहेत. विधानसभेत मंगळवारी एक प्रकरण उघड केले, तशी योग्य वेळी आणखीही प्रकरणे बाहेर काढून महाविकास आघाडीचे पितळ उघडे पाडले जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. दाऊदच्या दबावामुळे मलिकांचा राजीनामा घेतला जात नसल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

हेही वाचा :  Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत

‘बॉबस्फोट अजूनही विसरलो नाही’

दाऊदच्या कराचीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही, असा इशारा देत अ‍ॅड. आशीष शेलार म्हणाले, १९९३च्या भीषण बॉम्बस्फोटांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत़ त्या आम्ही विसरलो नाही. याकूब मेमनला फाशी देऊ नका, अशी भूमिका मंत्री अस्लम शेख यांनी घेतली होती आणि मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत. दिल्लीपुढे झुकणार नाही, असे सांगता, पण साडेतीन जिल्हे म्हणजे महाराष्ट्र नाही, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

रास्ता रोको न करण्याचे आवाहन

बारावीच्या परीक्षा असल्याने आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध मोर्चा काढावा, तोडफोड किंवा रास्ता रोको करू नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

फडणवीस हे राजकीय नटसम्राट : पटोले

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एखादी खोटी गोष्ट अत्यंत सफाईदारपणे खरी असल्याचे सांगतात. विधानसभेत त्यांनी सादर केलेला ‘व्हिडीओ बॉम्ब’ हे त्याचे उत्तम उदारण म्हणावे लागेल. अर्थात याबाबतचे उत्तर गृहमंत्री वळसे पाटील सभागृहात देतीलच. पण देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नटसम्राट आहेत, अशी टीका आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली़. राज्यातील सत्ता हातून निसटल्यापासून फडणवीस हे अस्वस्थ झाले आहेत. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून हे सरकार आता काही पडत नाही यामुळे ते फारच व्यथित झाले आहेत. यातूनच केंद्र सरकार व राज्यातील भाजपचे नेते वेगवेगळय़ा केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर करून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा :  आई आणि मुलीचा बॉयफ्रेंड एकच; लग्नासाठी दबाव आल्यावर असं काही केल की पोलिसही हादरले

भाजपचे शक्तिप्रदर्शन

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजपने बुधवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केल़े. आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी आक्रमक भाषणे केली़. मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दृष्टीने हे शक्तिप्रदर्शन महत्त्वाचे मानले जात़े.

The post सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …