उत्तर प्रदेशात हरदोईच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान मोदींनी सायकलचा संबंध अहमदाबाद बॉम्बस्फोटाशी जोडल्यानंतर अखिलेश यादव यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. ‘सायकल’ हे समाजवादी पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाने मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाने सायकलला आपल्या पक्षाचे चिन्ह कसे घोषित केले हे जाणून घेऊया..
उत्तर प्रदेशात सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सायकलचा उपयोग व्हायचा असे म्हटले होते. “पहिल्या स्फोटानंतर दुसऱ्या स्फोटात त्यांनी सपाच्या निवडणूक चिन्ह असलेल्या सायकलला बॉम्ब बांधून हॉस्पिटलमध्ये स्फोट घडवण्याची योजना आखली होती. संकटमोचन मंदिरावरही त्यांनी हल्ला केला आणि त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे सरकार होते. सपाने नेहमीच स्वतःच्या फायद्यासाठी अशी पावले उचलली आहेत. २००६ मध्ये काशीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. संकट मोचन मंदिरातही स्फोट झाला. तेथील कँट रेल्वे स्थानकावरही हल्ला करण्यात आला. २०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा या लोकांनी शमीम अहमद नावाच्या आरोपीवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता,” असे पंतप्रधानांनी म्हटले होते.
पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी ४ ऑक्टोबर १९९२ रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला सायकलचे चिन्ह मिळाले. सपाने २५६ जागा लढवून १०९ जागा जिंकल्या, त्यानंतर मुलायम सिंह यादव दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले.
मुलायम हे आधी १९८९ ते १९९१ पर्यंत जनता दलातर्फे मुख्यमंत्री होते, ज्यांचे निवडणूक चिन्ह चाक होते. मुलायम यांनी यापूर्वी इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांनी १९६७ मध्ये त्यांची पहिली विधानसभा निवडणूक युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून जिंकली, ज्यांचे निवडणूक चिन्ह वटवृक्ष होते.
मुलायम सिंह १९९६ पर्यंत सात वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९९२ मध्ये सपाच्या स्थापनेपूर्वी मुलायम यांनी ‘बैलांची जोडी’ आणि ‘खांद्यावर नांगर घेतलेला शेतकरी ‘ या चिन्हांवर निवडणूकही लढवली होती. “जेव्हा १९९३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी चिन्ह निवडण्याचा प्रश्न आला तेव्हा मुलायम सिंह आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी उपलब्ध पर्यायांपैकी सायकल निवडली,” असे सपा प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी सांगितले.
“कारण त्या काळात सायकल हे शेतकरी, गरीब, मजूर आणि मध्यमवर्गीयांचे वाहन होते आणि सायकल स्वस्त आणि आरोग्यासाठीही चांगली होती. तेव्हापासून सपाने सायकल या चिन्हावर सर्व निवडणुका लढवल्या आहेत,” असे पटेल म्हणाले. त्यांच्या पक्षाच्या विस्तारादरम्यान मुलायम आणि त्यांचे धाकटे बंधू शिवपाल सिंह यादव अनेकदा सायकल चालवत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही मुलायम प्रचारादरम्यान सायकल चालवत राहिले.
मागील अखिलेश यादव सरकारच्या काळात राज्यभरातील शहरांमध्ये सायकल ट्रॅक बांधण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले. विद्यार्थिनी व मजुरांना सायकल वाटप करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या सपाच्या निवडणूक चिन्हावर केलेल्या वक्तव्यावर पटेल म्हणाले की, “पंतप्रधान अशा प्रकारची टीका करतात. त्यांच्या सरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची चिंता नाही.
The post विश्लेषण : मोदींनी बॉम्बस्फोटांशी संबंध जोडलेल्या सायकलला सपाने निवडणूक चिन्ह म्हणून कसे निवडले? जाणून घ्या… appeared first on Loksatta.