गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता; नॅशनल क्राइम ब्युरोकडून धक्कादायक माहिती

Gujarat Missing Girls: गेल्या पाच वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राइम ब्युरोने (National Crime Bureau) ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. शिवसेनेने (Shivsena) सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) या मुद्द्याला हात घातला असून केंद्र सरकारवर जोरदार टीका केला आहे. ही माहिती समोर आणल्याबद्दल नॅशनल क्राइम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रातून दररोज 70 मुली बेपत्ता होत असताना मिंधे सरकार काय करत आहे? अशी विचारणाही करण्यात आली आहे. 

सामना संपादकीयमध्ये काय म्हटलं आहे?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री शहा ही जोडगोळी आपणच विश्वाचे तारणहार असल्याच्या आविर्भावात वावरत असते. 2014 च्या आधी भारत देश अस्तित्वात नव्हता, येथे कायदा नव्हता. संस्कृती नव्हती. 2014 ला मोदी आले आणि देशात सगळे आबादी आबाद झाले, असे ते आणि त्यांची भक्तमंडळी सुचवीत असते. मात्र आता मोदी-शहांच्या कारभाराचे ढोंग उघडे पाडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा आरोप मोदी यांना पाण्यात पाहणाऱ्या राजकीय विरोधकांनी केलेला नाही. नॅशनल क्राइम ब्युरोने ही धक्कादायक माहिती समोर आणली व ही माहिती समोर आणल्याबद्दल नॅशनल क्राइम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकते. कारण गुजरातमधील राज्यकारभाराचे धिंडवडेच या अहवालाने निघाले आहेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. 

“जगाच्या पाठीवर गुजरातसारखे दुसरे राज्य नाही. गुजरात हेच देशाच्या विकासाचे एकमेव मॉडेल आहे असा प्रचार होतो. जागतिक नेत्यांना दिल्ली-मुंबईच्या आधी गुजरातेत आणून मोठे कार्यक्रम घेतले जातात. गुजरात हे पंतप्रधान मोदींचे राज्य असल्याने तेथे जणू स्वर्ग अवतरला आहे असे चित्र निर्माण केले जाते, पण प्रत्यक्षात गुजरातची काळी बाजू यानिमित्ताने बाहेर पडली व ती धक्कादायक म्हणावी लागेल. ‘कश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच विवेक अग्निहोत्रीसारख्यांनी ‘गुजरात फाइल्स’ची निर्मिती करायला हरकत नाही, पण ‘द केरला स्टोरी’ आणि ‘कश्मीर फाइल्स’बाबत ‘हे सत्य आहे, दडपता येणार नाही’ असे प्रचारकी भाष्य मोदींसह समस्त भाजपने केले ते गुजरातमधील बेपत्ता 40 हजार मुलींवरील ‘स्टोरी’ला निदान पडद्यावर तरी पाठबळ देतील काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. 
 
“देशातील महिला असुरक्षित आहेत. महिला अत्याचाराच्या रोज थरारक कहाण्या प्रसिद्ध होत आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला कुस्तीपटू न्यायासाठी बसल्या आहेत, पण त्यांच्यावर ना पंतप्रधान मोदी बोलत ना गृहमंत्री शहा बोलायला तयार. पुन्हा त्यांच्या एकटय़ा गुजरातमध्येच 40 हजार महिला-मुली बेपत्ता होणे गंभीर आहे. हा आकडा एकटय़ा गुजरातचा असेल तर संपूर्ण देशातील आकडा भयावहच असायला हवा. आपणच महिला वर्गाचे एकमेव तारणहार आहोत, असे पंतप्रधान सांगतात. महिलांसाठी ‘जन धन’ योजनेसारख्या काही योजना त्यांनी सुरू केल्या, पण प्रश्न अशा योजना किंवा महिला सबलीकरणाच्या बोलबच्चनगिरीचा नसून महिलांच्या मोठय़ा प्रमाणात बेपत्ता होण्याचा आहे,” अशी माहिती शिवसेनेने दिली आहे. 
 
“धुळे-नंदुरबार ही गुजरातच्या सीमेवरील राज्ये. महाराष्ट्राच्या या दोन्ही जिल्ह्यांतून महिला- मुली मोठय़ा प्रमाणात गुजरातेत कामधंद्यासाठी जातात. काहींना तेथे लग्नाचे आमिष दाखवून नेले जाते व त्या हजारो महिला-मुलींचा पुढे थांगपत्ता लागत नाही. या मुलींचे नातेवाईक गुजरात-महाराष्ट्र पोलिसांचे उंबरठे झिजवतात व शेवटी मरून जातात. हे चित्र चांगले नाही. मुली गायब होणे हे गूढ आहे. गुजरातेत चाळीस हजार महिला गायब होतात, पण महाराष्ट्रातल्या मुली गायब होण्याचे प्रमाण गुजरातच्या तुलनेत कमी आहे. अर्थात असे असले तरी हा आकडा किमान वीस हजार इतका असावा. आता तर अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, महाराष्ट्रातून दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत. गेल्या फक्त तीन महिन्यांतील ही संख्या तब्बल साडेपाच हजारांपेक्षा जास्त आहे. मग राज्यातील मिंधे सरकार आणि त्याचे गृहखाते काय करीत आहे?,” असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. 

हेही वाचा :  'Rebuild Babri Masjid...';JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा

“राजकीय सूडापोटी विरोधकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या नाकाखालून तीन महिन्यांत साडेपाच हजारांवर मुली बेपत्ता कशा झाल्या? त्यांचा शोध घेण्यासाठी मिंधे सरकारने तपास यंत्रणा कामाला लावाव्यात. सावित्रीच्या लेकी असा उल्लेख आपण करतो त्या सावित्रीच्या लेकी हवेत गायब झाल्या की जमिनीत गडप झाल्या? याचा शोध पोलीस घेऊ शकलेले नाहीत. मुळात बेपत्ता मुलींचा तपास होत नाही. मुलगी बेपत्ता होणे ही पालकांसाठी यातनाच असते व अशा यातना महाराष्ट्र, गुजरातमधील अनेक कुटुंबे भोगत आहेत. महिला किंवा मुली बेपत्ता होण्यामागे जी कारणे दिसतात ती नेहमीचीच आहेत. कौटुंबिक कलहातून महिला घर सोडतात. अनेकदा घरात लग्नास, प्रेम प्रकरणास विरोध झाल्याने महिला घर सोडतात आणि सगळय़ात गंभीर म्हणजे महिला आणि मुलींना फसवून मानवी तस्करी करणारे मोठे रॅकेट देशात सक्रिय आहे. गरीब महिला व मुलींची तस्करी आजही मोठय़ा प्रमाणात होत आहे व कोणतेही सरकार त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. बजरंगबली, हनुमान चालिसा, धर्मांतरणे या मुद्दय़ांत भाजप व त्यांची सरकारे अडकून पडली आहेत,” अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

‘लव्ह जिहाद’ हा तर तणाव निर्माण करण्याचा त्यांचा हुकुमी एक्का आहे, पण गुजरातसह अनेक राज्यांतून हजारो महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत याव एकही भाजप जेहादी बोलायला तयार नाही अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे. 

हेही वाचा :  The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त

“हिंदुस्थानातील गरीब महिलांना फूस लावून, नोकरीच्या आमिषाने पूर्वी आखाती राष्ट्रांत पाठवले जात असे व तेथे जाऊन फसलेल्या महिला मरेपर्यंत अरबांच्या गुलाम म्हणून जगत असत. हे प्रमाण आता कमी झाले, पण त्याच वेळी मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले याची चिंता वाटते. म्हणूनच मुली बेपत्ता होण्याचे गुजरातच्या बाबतीत आलेले आकडे अस्वस्थ करणारे आहेत. गुजरातचा विकास झपाटय़ाने होतो आहे. विकास दर वाढला आहे. रोजगार वाढला आहे. क्रिकेटच्या सामन्यात गुजरातचे संघ जिंकू लागले आहेत. हे इतके सर्व मोदी-शहांच्या राजवटीने घडवून आणले, मग ज्या हजारो मुली गुजरातमधून बेपत्ता झाल्या, होत आहेत, त्या मुलींचे नातेवाईक आक्रोश करीत आहेत, त्या बेपत्ता मुलींचा शोध कोण घेणार? कायद्याचे राज्य गुजरातमध्ये अस्तित्वात असेल तर त्या मुलींना न्याय मिळेल. नाही तर या मुलींचे पलायन किंवा अपहरणास नेहरू-गांधी परिवारच कसा जबाबदार आहे यावर ‘मन की बाता-बाती’ करून लोकांना गुमराह केले जाईल. हिंदुस्थान विज्ञान, आधुनिकतेच्या मार्गाने निघालाच होता व त्यास खीळ बसून पुन्हा एकदा आपण पुराण युगात हिंदुत्वाच्या नावाखाली निघालो हे चित्र विदारक आहे. बेपत्ता मुलींना शोधायला हवे. पोलिसांना ते जमत नसेल तर त्यांनी गुवाहाटीत रेडा बळीसारखे सध्याचे विधी घडवून लाखो बेपत्ता मुलींचा शोध घ्यावा. नाही तर गुजरातच्या साबरमती आश्रमात राणा दांपत्यास 21 दिवस अखंड हनुमान चालिसा पठण कार्यक्रमास बसवावे. काही करा, पण बेपत्ता मुलींचा शोध लावा. गुजरात राज्यातून हजारो मुली बेपत्ता होणे हे बरे लक्षण नाही! मुली कोठे गेल्या? याची चिंता पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना नसेल तर त्यांना कोणत्याच प्रश्नाची चिंता नाही, असाच याचा अर्थ!,” अशा परखड शब्दांत शिवसेनेने सुनावलं आहे. 

हेही वाचा :  Shiv Jayanti : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहिती

Covishield Astrazeneca: कोविशील्डवरुन आता नवीन वाद सुरु आहे. या दरम्यान एस्ट्राजेनेकाने व्हॅक्सीनची पुन्हा मागणी केली …

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …