राज्याला पाच लाख मात्रा ; लसीकरणाचा जोर मात्र कमी
मुंबई : झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव्ही-डी’ या लशीच्या सुमारे पाच लाख मात्रा राज्याला प्राप्त झाल्या आहेत. नाशिक आणि जळगावमध्ये ही लस देण्याचे ठरले. पण एकीकडे लसीकरण बऱ्यापैकी झालेले आहे, तर दुसरीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लसीकरणाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे या लशीला फार कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा या लशींचा वापर कसा करावा, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे.
झायकोव्ही-डी या लशीला केंद्राने मान्यता दिल्यानंतर देशातील महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचे लसीकरण १८ वर्षांवरील नागरिकांमध्ये सुरू करण्याचे डिसेंबर २०२१ मध्ये केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केले होते. केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातील आरोग्य विभागाने यासाठी नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांची निवड केली. यालाही आता जवळपास दोन महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर केंद्रामार्फत आता या लशींचा साठा लसीकरणासाठी पुरविला जात आहे.
या लसीकरणासाठी निश्चित केलेल्या नाशिक आणि जळगावमध्ये लवकर या लशीचे लसीकरण सुरू केले जाईल, असे आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
नाशिकमध्ये १८ वर्षांवरील सुमारे ८६ टक्के नागरिकांनी लशीची पहिली तर सुमारे ६० टक्के नागरिकांनी दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत. जळगावमध्ये सुमारे ८१ टक्के नागरिकांना पहिली आणि सुमारे ५८ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा दिलेली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पहिल्या मात्रेचे लसीकरण बहुतांशपणे झालेले आहे. त्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता लसीकरणाकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे. नाशिकमध्ये डिसेंबरमध्ये १८ वर्षांवरील सुमारे दहा हजार नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण दरदिवशी केले जात होते. परंतु सध्या हे प्रमाण दोन हजारांच्याही खाली गेले आहे. जळगावमध्ये तर सध्या १८ वर्षांवरील सुमारे ५०० नागरिकांना पहिली लस दरदिवशी दिली जाते.
दोन्ही जिल्ह्यांमध्ये पहिल्या मात्रेचे लसीकरण बहुतांश पूर्ण झाले आहे. त्यात आता संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे लसीकरणाचा जोर ही कमी झाला आहे. त्यामुळे झायकोव्ही-डीची ही लस कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या लशीच्या तीन मात्रा घ्याव्या लागतात. नागरिक दुसरी मात्रासुद्धा घेण्यासाठी फारसे तयार नाहीत. तिथे तीन मात्रांपर्यत यांचा पाठपुरावा करणे आणि लसीकरण पूर्ण होणे अधिक आव्हानात्मक आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मात्रा फार..
केंद्राकडून झायकोव्ही-डीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे पाच लाख मात्रा प्राप्त झाल्या. येत्या काळात आणखी काही मात्रा येतील. एकूण १५ ते १६ लाख मात्रा येण्याची शक्यता आहे.
वैशिष्टय़..
झायकोव्ही- डी लस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी असणार आहे. ही लस तीन मात्रांमध्ये देण्यात येणार असून इंजेक्शनविरहित आहे. यामध्ये सुईचा वापर केलेला नसून पेनासारख्या यंत्राद्वारे दाब देऊन ती दिली जाणार आहे. सुईच्या भीतीमुळे लस न घेणाऱ्यांसाठी ती फायदेशीर असेल.
The post ‘झायकोव्ही-डी’च्या वापरावर प्रश्न; राज्याला पाच लाख मात्रा ; लसीकरणाचा जोर मात्र कमी appeared first on Loksatta.