लोकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी कमळाला मोठ्या प्रमाणात मतदान केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कासगंज येथे पोहोचले होते. पहिल्या टप्प्यात भाजपाला प्रचंड बहुमत मिळेल, असा दावा करत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. या लोकांनी आतापासून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये विकेट न मिळाल्यावर निराश झालेला गोलंदाज अंपायरवर रागावतो असे म्हणाले. ईव्हीएमवरच प्रश्न उपस्थित करायचा असेल तर १० मार्चनंतर बरेच दिवस बाकी आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. गुरुवारी रात्री कैराना येथे एका वाहनात ईव्हीएम सापडल्यानंतर समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी ते राखीव ईव्हीएम असल्याचे सांगितले होते.
“काल, उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. लोकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी कमळाला मोठ्या प्रमाणात मतदान केले. विशेषतः आमच्या बहिणी आणि मुलींनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. आलेले ट्रेंड पहिल्या टप्प्यात भाजपाचा झेंडा फडकत असल्याचे सांगत आहेत. काल दुपारनंतर त्या सर्व नेत्यांच्या मुलाखती आल्या आहेत, त्यांचे चेहरे पडलेले आहेत. आता ते कुटुंबाबद्दल बोलू लागले आहेत. योगीजी, तुम्ही या लोकांचे काय करुन ठेवले?,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
“तुम्ही पाहत आहात की जे खूप कुटुंबाभिमुख आहेत त्यांनाही बोट बुडत असल्याचे कळले आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये काय होते हे तुम्हाला माहीत आहे. गोलंदाज चेंडू फेकतो आणि विकेट न मिळाल्यास तिथे पोहोचण्यापूर्वी ओरडतो, आऊट… आऊट.. तसे झाले नाही तो तर अंपायरवर राग काढतो. पहिल्या टप्प्यानंतर हे लोक ईव्हीएमला दोष देऊ लागले आहेत. आता जनता तुम्हाला” स्वीकारणार नाही, जनतेला गुंडराज नको आहे. ईव्हीएमचा वाईट प्रचार करायचा असेल तर १० मार्चनंतर बरेच दिवस आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
“खूप पक्षांनी अशा गुन्हेगारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे, ज्यांचा तुमच्यावर राग आहे. या गुन्हेगार, गुंडांचा पराभव करण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना एकजुटीने मतदान करावे लागेल. गुन्हेगारांना बदला घेण्याची संधी कधीही देऊ नका. तुम्ही मोदी आणि योगी यांना जे आशीर्वाद देत आहात त्यामुळे या पक्षांची झोप उडाली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने कठोर परिश्रम करून प्रगती केली पाहिजे, त्यासाठी जे वातावरण आवश्यक आहे, ते वातावरण योगीजी सरकारने दिले आहे,” असेही मोदी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.