मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. तर, त्यांच्या मोठ्या भावाचे नाव संभाजीराजे भोसले होते. महाराजांच्या जीवनावर जिजामाता यांच्या संस्कारांचा मोठा प्रभाव होता. त्यांची प्रेरणा आणि त्यांनी दिलेले शिक्षण यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज एक शूर, कार्यक्षम आणि हुशार शासक बनले. शिवराय गनिमी काव्यामध्ये पारंगत होते. तसेच त्यांनी आखलेल्या रणनीती आणि त्यांची समज यामुळे मुघल देखील त्यांना घाबरायचे. महाराजांनी आपल्या याच गुणांच्या आधारावर मराठा साम्राज्याचा पाय रचला. ते एक असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत जे आजही आणि सदैव आपल्या विचारांनी नव्या पिढीला प्रेरणा देत राहतील. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण महाराजांचे काही प्रेरणादायी विचार जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरक विचार :
शिवाजी महाराज एक धार्मिक आणि सचोटीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे असे म्हणणे होते की जी व्यक्ती धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि परमेश्वरासमोर डोकं टेकते, त्या व्यक्तीचा जग आदर करते.
शिवाजी महाराज म्हणायचे, स्वतंत्रता एक वरदान आहे आणि त्यावर सर्वांचाच अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज एक स्वाभिमानी व्यक्ती होते. त्यांनी म्हटले आहे की कधीही कोणापुढेही आपली मान झुकवू नका, नेहमी ताठ मानेने जागा.
शिवरायांच्या आयुष्यात जिजामाता यांचे स्थान सर्वोच्च होते. म्हणूनच ते प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानायचे. त्यांनी नेहमीच स्त्रियांचा आदर केला आणि इतरांनाही स्त्रीचा आदर करण्याची शिकवणूक दिली. तसेच, ते महिलांच्या इतर अधिकारांच्या बाबतीत नेहमी आग्रही असायचे.
महाराज म्हणायचे, जेव्हा निश्चय पक्का असेल तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगाऱ्यासारखा भासेल. त्यांच्या या विचारावरून आपण त्यांच्या धाडसी वृत्तीचा अंदाज लावू शकतो.
महाराज म्हणायचे की आपल्या शत्रूला कधीही दुर्बल समजू नये. परंतु त्याला ताकदवान समजून घाबरूनही जाऊ नये. एखाद्या बलवान शत्रूला आपण आपल्या धैर्याने आणि दृढ इच्छाशक्तीने पराभूत करू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, फक्त शक्ती असल्याने कोणीही शासक बानू शकत नाही. त्यासाठी इच्छाशक्ती असणेही महत्त्वाचे आहे. जेणेकरून चांगली सत्ता स्थापन करता येईल.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा पुरेपूर विचार करणे गरजेचे आहे. कारण आपण जे काम करतो त्याचे अनुकरण पुढील पिढ्या करतात.
शिवराय म्हणायचे जो व्यक्ती कठीण काळातही दृढ इच्छाशक्तीने कार्य करत राहतो, त्याचा काळ आपसूकच बदलतो.
The post Chhatrapati Shivaji Jayanti 2022: प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार appeared first on Loksatta.