‘हिंदुत्व, परिवारवाद ते हुकुमशाहीपर्यंत..’उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray Interview: कोणाच्याही धाकदपटशाला बळी पडणं ही आपली संस्कृती नाही, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग नुकताच प्रकाशित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका, इंडिया, आगामी निवडणुकांवर भाष्य केले.

तेव्हा जनसंघाची किंवा यांची  घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान. आता त्याच्यात त्यांनी जोडलंय ‘एकच पक्ष’. जे मी आणि जनता कदापी मान्य करू शकत नाही. देश एक मान्य. एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही, असे ते म्हणाले. 
 
ते इतरांना अगदी खुलेआम भ्रष्टाचारी म्हणतात, त्यांची विटंबना करतात, त्यांना आयुष्यातून उठवतात आणि आयुष्यातून उठवून झाल्यानंतर ते आपल्या बाजूला मांडीला मांडी लावून बसवतात. हे हिंदुत्व नाहीये, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, ते असं म्हणताहेत ना की परिवार वाचवणारे सगळे विरोधक तिकडे एकत्र आले आहेत. मग तुम्ही सत्ता वाचवायला एकत्र आलात का? जसं बंगळुरूला परिवार वाचवण्यासाठी ही लोकं एकत्र आली असं त्यांचं म्हणणं आहे. मी ठामपणे म्हणतो, होय… परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोत. माझा देश माझा परिवार आहे. हेच माझं हिंदुत्व आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना मी कोविड काळात राबवली होती. तीच आज देशभरात राबवण्याची वेळ आली आहे, की ‘माझा देश माझी जबाबदारी’ आहे.
 
मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे आमने-सामने करणारा मी आहे. जशास तसं उत्तर देणारा मी आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करणारा आहे. त्यामुळे मी लढतोय, असे ठाकरे म्हणाले. 

मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे 

महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचंच रूपांतर आता देशभरात ‘इंडिया’ नावानं झालंय म्हणून इतर राज्यांतले जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यात काँग्रेस मोठा पक्ष आहेच, इतर पक्ष त्यात सामील झाले आहेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे.||
 
राहुल गांधींना यापूर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज-गैरसमजच जास्त होते, ‘ते’ असे आहेत… ‘ते’ तसे आहेत… ‘ते’ हिंदुद्वेष्टे आहेत. प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की, राहुल गांधी समजून घेताहेत, ऐकताहेत, त्यांना जे काही वाटतंय ते हळुवारपणे बोलताहेत आणि नुसतं ऐकून घेत नाहीत, तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांच्या समोर मांडतातसुद्धा. अशा पद्धतीनेच जर का हे पुढे सुरू राहिलं तर मला वाटत नाही की, पुढे काही अडचण येईल.||
 
आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे. त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय? पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे, चिन्ह चोरलं आहे, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत.||
 
भाजप पाडत असलेला पायंडा हा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच बनणार! असं जर का चालू राहिलं तर कठीण आहे. ज्या पद्धतीने आता हे महाराष्ट्रातील सरकार स्थापन झाद्दलंय, ते कसं झालंय हे गावागावातलं अगदी साधं पोरसुद्धा सांगेल की कसे हे जन्माला आले आहेत. अशा पद्धतीने उद्या कोणीही… म्हणजे खोके सरकार म्हणतात त्याला… उद्या खोके घेऊन येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल.||
 
भाजपमध्येसुद्धा राम आता राहिलेला नाहीये. आहेत ते फक्त आयाराम आहेत. भाजपचा राम कधीच गेलेला आहे. आहेत ते फक्त आयाराम, बाकी गयाराम. हा सगळा आयारामांचा पक्ष आहे. तर आयारामांना तुम्ही सामावून घेताना मुळात तुमच्या पक्षातला जो राम होता, त्याला आता तुम्ही फक्त कामापुरता वापरणार का? की त्याला पण तुम्ही संधी देणार आहात.||
 
तुम्ही तर जागा वाटपाच्या तिढय़ाबद्दल बोलताय. तिकडे तर मंत्रीपदाचा तिढा निर्माण झालाय, तो कसा सुटणार?||
 
त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती आहे, पण शक्तीचा आत्मविश्वास नाही. म्हणून ते सत्ता आहे तोपर्यंत अशा पद्धतीत राबवत आहेत, तेसुद्धा सरकारी यंत्रणेतून. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे बाजूला ठेवा आणि यांचे काय हाल होतील ते बघा…माझी त्यांना भीती वाटतेय. शिवसेनेची भीती वाटतेय त्यांना, म्हणूनच ते निवडणुका घेत नाहीत.||
 
आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या 92 हजार कोटींच्या ठेवी आपण निर्माण करून दिल्या. त्या सगळ्या रिकाम्या करायच्या. जो आता भ्रष्टाचार सुरू आहे तो त्या ठेवी रिकाम्या करण्याचाच आहे…  आणि मग मुंबईला भिकेचा कटोरा देऊन जसे आज हे दिल्लीला मुजरे मारायला गेलेत तसे दिल्ली दरबारी मुजरे करायला बोलवायचे. ||
 
मग मुंबईची जी स्वायत्तता आहे ती त्यांना मारायची आहे.  नुसतीच मुंबई शिवसेनेकडून हिसकवायची नाही तर मुंबई आपल्या अंगठय़ाखाली ठेवायची आणि त्यासाठीसुद्धा त्यांना लोढाच सापडला. म्हणजे बिल्डरच्या हातात तुम्ही मुंबई देताय? पालकमंत्री म्हणून मग दुसरा कुणी पालकच नाही का मुंबईला? मंत्री म्हणून त्याचं ऑफिस तुम्ही तिकडे ठेवताय, मग महापौरांचं दालन तुम्ही मंत्रालयात ठेवणार आहात का? महापौर मुंबईचा आहे… मंत्रालय मुंबईत आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मग त्या मुंबईच्या महापौराचं दालन तुम्ही मंत्रालयात ठेवणार आहात का मुख्यमंत्र्यांच्या बाजूला?||
 
एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दोघांना वाचवलं होतं. माननीय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना… त्याचे पांग तुम्ही असे फेडताय का? आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा. बघू या माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे. ||

हेही वाचा :  "मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला

ईव्हीएमची गरजच राहिली नाही. तुम्ही मत कोणालाही द्या… सरकार माझंच होणार. त्यामुळे आता ईव्हीएम वगैरे मुद्दे कालबाह्य झाले. ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडून आलेले लोक तुम्ही धाकदपटशा दाखवून जर का फोडून तुमच्याकडे घेत असाल, मग ईव्हीएमची पण गरज नाही ना? ||

इंडियाला एनडीएचा पराभव करावाच लागेल आणि मी करणारच. हे होऊ शकतं हे दाखवून द्यावंच लागेल.||
 
महाराष्ट्राच्या लोकांना मी हेच सांगेन की, आपल्यावर जो संस्कार आहे तो संस्कार जपला पाहिजे. ते जे करताहेत तो आपला संस्कार नाही, ती आपली संस्कृती नाही. रोज उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाहीच आणि कोणाच्याही धाकदपटशाला बळी पडणं ही आपली संस्कृती नाही. मग ती जर का संस्कृती मानणार नसू तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचा अधिकार नाही. ||
 
कोविड काळात संपूर्ण जग एका भीतीच्या वातावरणात होतं आणि तेव्हा महाराष्ट्राने आणि मुंबईने एक ‘मुंबई मॉडेल’ जगाला दाखवलं, ज्याचं कौतुक हे सातासमुद्रापलीकडेसुद्धा झालं, सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा केलं. एक मनाचा दिलदारपणा पाहिजे, मोठेपणा पाहिजे की जे तुम्ही करू शकला नाहीत ते माझ्या मुंबईने केलं. पण त्याचं कौतुक करायचं तर सोडाच, पण तुमचं जगभरात नाव झालं काय? आमचं नाही झालं काय? म्हणून तुमचं नावसुद्धा आम्ही बदनाम करू. ही जी घाणेरडी वृत्ती आहे… ही संस्कृती आपली नाहीये…||
 
नेताजी सुभाषचंद्रांचा पुतळा दिल्लीमध्ये उभारला गेला. त्यांच्या कन्या मला वाटतं जर्मनीत राहतात आणि त्यांनी सांगितलं होतं की सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे… तुम्ही उजव्या विचारसरणीचे… पहिली विचारसरणी तुम्हाला मान्य आहे का? वल्लभभाईंचा पुतळा उभा केला… म्हणजे पुतळे उभे करून दुसऱयांचे आदर्श चोरायचे… तेच चाललंय. बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे.

हेही वाचा :  'कॉंग्रेसव्याप्त भाजप'चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …