आधी उघडकीस आलेल्या प्रकरणांबाबत संशय
नागपूर : वन्यप्राणी शिकारींची माहिती देऊन मोबदल्यात बक्षिसी लाटणारा आणि वनखात्यासाठी ‘खबऱ्या’ची भूमिका निभावणारा स्वयंघोषित ‘महाराज’ बिबटय़ाच्या शिकार प्रकरणात अडकल्याने खात्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या अटकेमुळे मागील दीड वर्षांत उघडकीस आलेल्या शिकार प्रकरणांभोवती संशय निर्माण झाला आहे.
नागपूर व भंडारा वनविभागाने संयुक्त कारवाई करत बिबटय़ाच्या अवयवांच्या तस्करीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील तोरगाव येथून आरोपीला सहा-सात दिवसांपूर्वी अटक केली. गुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात नोंदवण्यात आल्याने ब्रम्हपूरी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. काही आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी राम महाराजांचे नाव घेतले. खात्याच्या अधिकाऱ्यांनी या महाराजांचा शोध घेत रविवारी रात्री दोन वाजता अटकेची कारवाई केली असता नंदू पिंपरे हीच व्यक्ती महाराज म्हणून वावरत असल्याचे स्पष्ट झाले. वन्यप्राण्यांचे अवयव विक्री करुन देईल, असे सांगून स्वत:च वन्यप्राण्यांची शिकार करायला लावायची आणि आरोपींना पकडून देत वनखात्याकडून बक्षीस लाटायचे. दुसरीकडे आरोपीला सोडवून देतो म्हणून सांगत त्यांच्या नातेवाईकांकडूनही पैसे उकळायचे, असे उद्योग हा महाराज करायचा. एवढेच नाही तर महाराज बनून पैसे दुप्पट करुन देण्याचे आमीषही तो दाखवायचा. नंदू पिंपरे उर्फ महाराज याला याच कारणांसाठी तेलंगणातील मंचेरियल पोलिसांनी जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती. तब्बल चार महिने तुरुंगात काढल्यानंतर त्याची सुटका झाली. त्यानंतरही या व्यक्तीचा हा व्यवसाय बंद झाला नाही. काही वर्षांपूर्वी बहेलिया शिकाऱ्यांचे अटकसत्र विदर्भात सुरू झाले तेव्हाही या प्रकरणात त्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी त्याला धुडकावून लावले. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून नागपूर वनविभाग करत असलेल्या शिकार कारवायांपैकी अनेक प्रकरणात याच व्यक्तीने ‘खबऱ्या’ म्हणून भूमिका पार पाडल्याचे समजते. त्यामुळे या कारवायांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या नंदू पिंपरेबाबत वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी वनखात्यातील वरिष्ठांना सावध करण्याचा प्रयत्न केला. तरीही खात्यातील काही अधिकाऱ्यांनी त्याला सोबत घेतले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर त्याला अटक झाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. अटकेनंतर लगेच त्याने काही अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडण्यात आला. त्यानंतरही त्याच्या सुटकेसाठी दबावतंत्राचा वापर झाल्याचे कळते. या अटकेबाबत ब्रम्हपूरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा यांना संपर्क साधला असता अटकेला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, प्रकरणाचा तपास सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
The post वनखात्याचा खबऱ्याच शिकारीत अडकला; आधी उघडकीस आलेल्या प्रकरणांबाबत संशय appeared first on Loksatta.