actor manoj vajpayee actress nina gupta in jaipur literature festival zws 70 | वाजपेयींच्या ‘सत्या’ आठवणी आणि गुप्तांचा ‘सत्य’आग्रह


अभिनेत्री नीना गुप्ता यांची संभाव्य बेधडक विधाने ऐकण्यासाठी  उन्हाची तमा न बाळगता ‘फ्रण्ट लॉन’ प्रेक्षकांनी व्यापले.

पंकज भोसले, लोकसत्ता 

जयपूर : एक वर्षांच्या करोना अडथळय़ानंतर प्रत्यक्षात प्रगटलेल्या ‘जयपूर साहित्य महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसावर बॉलीवूड तारांकितांचे वर्चस्व राहिले. एकीकडे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय चर्चासत्रांत विचारांची लयलूट वगैरे सुरू असताना सर्वाधिक गर्दी फक्त आणि फक्त अभिनेते मनोज वाजपेयी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी खेचली.

अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या ‘सत्या’ चित्रपटाच्या आठवणींचा उजाळा  ‘दरबार हॉल’ आणि ‘फ्रण्ट लॉन’ या दोन भव्य जागांमध्ये अपुरा पडला. या दोन्ही ठिकाणी तरुणाई आणि ज्येष्ठांनी द्वाराभोवतीचा परिसरही मोकळा सोडला नाही. तर ‘सच कहूं तो’ ही इंग्रजी आत्मकथा लिहिणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांची संभाव्य बेधडक विधाने ऐकण्यासाठी  उन्हाची तमा न बाळगता ‘फ्रण्ट लॉन’ प्रेक्षकांनी व्यापले.

सत्या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये अभिनय, पटकथा आणि चित्रपटाचा प्रवाह बदलण्यात कोणती भूमिका बजावली याची जंत्रीच वाजपेयी यांनी सादर केली. ‘प्युअर इव्हिल: द बॅड मॅन ऑफ बॉलीवूड’ हे बालाजी विठ्ठल लिखित पुस्तक, उदय भाटिया यांच्या ‘बुलेट्स ओव्हर बॉम्बे’ आणि ‘कुछ पाने की जिद’ या पियूष पांडे यांनी लिहिलेल्या मनोज वाजपेयी यांच्या चरित्रपुस्तकावरील गप्पासत्रात वाजपेयीच भाव खाऊन गेले. ते म्हणाले, ‘सत्या’तील भिखू म्हात्रेला मी कधी खलपुरूष म्हणून पाहत नाही. त्याला वाईट व्यक्तिरेखेच्या वर्गवारीत टाकता येऊ शकत नाही. जरी तो चित्रपटात गँगस्टर असला, तरी लोकांना त्यामध्ये त्यांचा हीरो दिसला. त्याचा राग, क्रोध त्याचे मित्र, पत्नी आणि कुटुंबावरचे प्रेम यांमुळे आधीच्या माफिया चित्रपटांमध्ये लोकांना  खलनायकात जे पाहायला मिळाले, त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी या चित्रपटात दिसले.  या व्यक्तिरेखेमुळे माझ्यासह इरफान खान, के.के.मेमन या कलावंतांना धोपट नसलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे काय, याची व्याख्या सापडली. या काळामध्ये खलनायकाला अतिवाईट आणि नायकाला अतिचांगला दाखवता येणे अशक्य असल्याची धारणा लेखकांपासून सगळय़ा सहकलाकारांमध्ये असल्यामुळे भिखू म्हात्रे सामान्यांतला खलनायक म्हणून साकारला आणि लोकांनी त्याला स्वीकारले. ‘सत्या’चा दिग्दर्शकच नाही तर लेखक, सिनेमॅटोग्राफर देखील मुंबई बाहेरचे होते. या सर्व बाहेरच्यांनी या सिनेमातील मुंबई घडविली.  या चित्रपटात आधी नायकाची भूमिका मिळेल असे आश्वासन मिळाले होते. मात्र नंतर ती भूमिका नसल्याने मन खट्टू झाले, पण पुढे  नायक नसलेल्या भिखू म्हात्रेमध्येच लोकपसंतीचा घटक असल्याचे लक्षांत आले, या आठवणीसह चित्रीकरण काळातील अनेक किस्से वाजपेयी यांनी सांगितले. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधील सरदार खानच्या व्यक्तिरेखेतील कामलोलुप पुरुष उलगडून दाखविताना वाजपेयी यांनी उपस्थितांना प्रचंड हसविले. 

हेही वाचा :  कोल्हापुरात नकली नोटांचा वापर? पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

जगभरासाठी करोनाकाळ हा अत्यंत वाईट ठरला असला, तरी मनोरंजन उद्योगासाठी तो सुवर्णकाळ ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. काही चित्रपट मी महोत्सव वर्तुळातील प्रेक्षकांसाठी केले. काही व्यावसायिक, काही ओटीटी फलाटावरील प्रेक्षकांसाठी पण चित्रपट उद्योग माझी छबी कधीच सरधोपट कलाकार म्हणून करू शकला नाही, याकडे वाजपेयी यांनी लक्ष वेधले.

नीना गुप्ता यांची खंत

नीना गुप्ता यांनी बॉलीवूडमधील पूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यांची तुलना केली. पूर्वी सिनेक्षेत्रात येणाऱ्या तरुणींचे शोषण होत असे, आज वातावरण बरेच सुधारले आहे. हा ‘मी टू’ चळवळीचा परिणाम असेल.  चांगले लोक काम करीत आहेत आणि नव्या कलाकारांना वेगळे काही करण्यासाठी संधी मिळत आहे. पंचवीस वर्षे उशिरा जन्मले असते, तर या वातावरणात अभिनेत्री  म्हणून काम करताना आणखी मजा आली असती.  पण त्या काळातही मला नायिकेचे समाधान कधी मिळाले नाही. अगदी कलात्मक सिनेमात देखील माझ्या वाटेला सहायक भूमिका यायची. मुख्य भूमिकेत स्मिता असायची, शबाना असायची किंवा दिप्ती असायची.  सहायक भूमिकेला तेव्हा फार महत्त्वही नव्हते. अन् तीच माझ्या वाटेला यायची.  संस्कृतमध्ये एमफील करीत असताना माझ्या तोकडय़ा कपडय़ांमुळे महाविद्यालयात माझ्याशी कुणी ओळख करायलाही धजावत नसे. मात्र नंतर माझ्या परीक्षेतील गुणांमुळे मला काही प्रमाणात मित्र-मैत्रिणी मिळाल्या, ही आठवणही त्यांनी जागवली. त्यांच्या सत्राला प्रश्नांचा दिवसभरातील सर्वात मोठा पाऊस पडला.

हेही वाचा :  महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव उभा नंदी; रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर

अन्यत्र जेमतेम उपस्थिती

लोकशाहीचा निर्देशांक,  दक्षिण आशियाच्या पार्श्वभूमीवर भारताची बदललेली स्थिती,  वीर सावरकरांचे आयुष्य व त्यांची चरित्रे, भारतातील शोषितांचे जगणे, अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व, जागतिक प्रवासाचे मानिबदू, महिला सक्षमीकरण, चित्रकला, नेपाळी साहित्य आदी विविध विषयांच्या चर्चासत्रांत मान्यवर वक्त्यांची मांदियाळी असताना यातील कोणत्याही सत्रांना, उपलब्ध आसनक्षमतेच्या निम्मी डोकीही उपस्थित राहिली नाहीत.

सत्या चित्रपटाने साऱ्याच प्रकारे पुढे येणाऱ्या माफिया चित्रपटांना दिशा दिली. या व्यक्तिरेखेमुळे माझ्यासह इरफान खान, के.के.मेमन या कलावंतांना धोपट नसलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे काय, याची व्याख्या सापडली. – मनोज वाजपेयी

आयुष्यात जर कोणती खंत असेल, तर (क्षमा मागून) सगळय़ा शबाना आझमीच्या भूमिका मला करायला मिळाल्या हव्या होत्या. सगळय़ा निकोल किडमनच्या भूमिका मला मिळाल्या असत्या, तर त्याही करायला आवडल्या असत्या. – नीना गुप्ता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …