‘मराठा विरुद्ध OBC वरुन कॅबिनेटमध्ये गँगवार, एक-दोन मंत्री मार खातील’; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा टोला

Sanjay Raut On Maratha Aarakshan vs OBC Reservation: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य मंत्रिमंडळात गँगवॉर सुरु असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील विरुद्ध ओबीसी नेते असा शाब्दिक संघर्ष रंगल्याचं चित्र दिसत आहे. ओबीसी नेत्यांपैकी विद्यमान मंत्री छगन भुजबळ तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आहेत. जरांगे-पाटलांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. दुसरीकडे शिंदे गटाने उघडपणे छगन भुजबळांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. यावरुनच सरकारमधील मित्रपक्षांमध्ये मतभेद दिसत आहेत.

मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान उठलं आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजाकडून वेगवेगळे दावे केले जात असतानाच राजकीय नेतेही या वादात उड्या घेताना दिसत आहेत. एकीकडे राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले असतानाच दुसरीकडे यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झालेत. मराठा आरक्षणा मुद्द्यावरुन मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ आमने-सामने आलेत मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी ओबीसी नेत्यांमुळे मराठ्यांचं वाटोळं झालं आहे असा आरोप केला आहे. ओबीसी नेत्यांमुळेच मराठ्यांना आरक्षण नाही असं जरांगे-पाटील म्हणालेत.

हेही वाचा :  Maharashta Politics : संजय राऊत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश आहेत का? मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला संताप

मंत्री एकमेकांवर धावतात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या सत्ताधाऱ्यांमध्येच मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले असून त्यांचा एकमेकांशी वाद सुरु आहे. हा मुद्दा अधोरेखित करत संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.  “मराठा-ओबीसी मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होत आहे, हे तुम्हाला माहिती नाही का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडणं सुरु आहेत. मला तर वाटतंय की, कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील. मंत्री एकमेकांना मारतील इतकं वातावरण बिघडलं आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदेंचा उल्लेख करत लगावला टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या सगळ्यावर कोणतंही नियंत्रण नाही, असंही संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. “आम्हाला आतून ज्या बातम्या मिळत आहेत त्यावरून सांगतो की, काही मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जातात. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण नाही. छगन भुजबळ, साताऱ्याचे शंभूराज देसाई असे खूप जण आहेत. मी इतरही नावं घेऊ शकतो. राज्यावर अशी परिस्थिती यापूर्वी कधीच आली नव्हती,” असं राऊत म्हणाले.

तिसऱ्या टप्प्यातील मराठा आंदोलनाची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. मनोज जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा राज्यभरात दौरे करणार आहोत, असं जाहीर केलं आहे. राज्यव्यापी साखळी उपोषण कार्यक्रमाची घोषणा करताना मनोज जरांगे-पाटलांनी, १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील एकही गाव असं राहणार नाही की, जिथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु नसेल. त्याची तयारी आतापासूनच सुरु करावी, असे आवाहन समाज बांधवांना केलं आहे.

हेही वाचा :  'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

पैसे देऊ नका

मराठा आंदोलनासाठी कोणत्याही पद्धतीची देणगी देण्याची गरज नाही असंही मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. आमच्या दौऱ्यांसाठी किंवा मराठा आंदोलनाच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊ नका. आमचे दौरे आणि सभांसाठी येणारे लोक स्वत:च्या पैशांनी येतात. आमचे डिझेलचे पैसेही आम्हीच भरतो. हे आंदोलन पैसे कमावण्यासाठी नव्हे तर सामान्य मराठ्यांना न्याय देण्यासाठी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …