उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकार स्थापन करतील, असंही राऊत म्हणाले.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. तर, २०२४मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभा निवडणुका लढेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“आम्ही नुकतेच गोव्याहून परत आलो आहोत आणि लवकरच आदित्य ठाकरेंसोबत उत्तर प्रदेशला भेट देणार आहोत. तिथे अखिलेश यादव सरकार स्थापन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लोकसभा निवडणूक लढवू; त्यासाठी तयारी सुरू झाली आहे,” असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले.
शिवसेना गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवत आहे. त्यासाठी शिवसेनेचे अनेक नेते प्रचार करताना दिसून येत आहेत. आदित्य ठाकरे देखील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेसाठी गोव्यात गेले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशला देखील भेट देणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या विधानावरही भाष्य केलं. “सरमा या महाशयांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली. तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला नाही का? हे तेच राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत ज्यांच्यासोबत बिस्वा यांनी आयुष्य काढलं आणि आता त्यांच्याविरोधात बोलत आहेत. हे चुकीचं आहे. आपल्या आधीच्या नेत्यांविषयी अशा भाषेत बोलणं योग्य नाही,” असं राऊत म्हणाले.