बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षणविषयक त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँकेला पुढील आदेश येईपर्यंत नवीन ग्राहकांची खाती उघडता येणार नाहीत, असे फर्मान रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी दिले. बँकेला तिच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचे सर्वसमावेशक परीक्षण करण्यासाठी त्रयस्थ ‘आयटी ऑडिट’ कंपनी नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षणविषयक त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत अधिकारांचा वापर करीत रिझव्र्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला तात्काळ प्रभावाने, नवीन ग्राहक जोडण्यास थांबवण्याचे निर्देश शुक्रवारी दिल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
माहिती-तंत्रज्ञान प्रणालीच्या परीक्षणाच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर, रिझव्र्ह बँकेद्वारे प्रदान केलेल्या विशिष्ट परवानगीच्या अधीन बँकेला नवीन ग्राहकांना सामावून घेता येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेची ऑगस्ट २०१६ मध्ये स्थापना होऊन, मे २०१७ मध्ये नोएडा येथील शाखेतून तिचे औपचारिकपणे कार्यान्वयन सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी क्षेत्रातील बँकांबाबत रिझव्र्ह बँकने कारवाईची पावले अनेकदा टाकली आहेत. डिसेंबर २०२० मध्ये, एचडीएफसी बँकेला कोणतीही नवीन डिजिटल उत्पादने किंवा सेवा प्रस्तुत करण्यापासून आणि बँकेबाबत आढळून आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण होईपर्यंत नवीन क्रेडिट कार्ड वितरित करण्यास रिझव्र्ह बँकेने मनाई केली होती.