उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Navi Mumbai Metro : उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. नागरीकांसाठी तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.  अनेक वर्षांपासून नवी मुंबईचे नागरीक या मेट्रो सेवेचा शुभारंभ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. 

नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. 1 वर शुक्रवारी म्हणजेच 17 नोव्हेंबर 2023 पासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

“बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो 17 नोव्हेंबर 2023 पासून नवी मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. याबद्दल नवी मुंबईकरांचे हार्दिक अभिनंदन. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी औपचारिक उद्घाटनाची वाट न बघता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवेला प्रारंभ होत आहे, याबद्दल सिडकोचे अभिनंदन आणि नवी मुंबईकरांना शुभेच्छा. मेट्रोद्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे मेट्रोच्या अंमलबजाणीचे काम प्रभावीपणे सुरू आहे.”

हेही वाचा :  VIDEO : 'इथं हेमा मालिनींना पण नाचायला लावलं'; गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

नवी मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण

17 नोव्हेंबर 2023 पासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वरील बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था मेट्रोद्वारे निर्माण होणार आहे.

असा आहे नवी मुंबई मेट्रोचा मार्ग  

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून सिडकोतर्फे प्रथम बेलापूर ते पेंधर या 11.10 किमी लांबीच्या मार्ग क्र. 1 चे काम हाती घेण्यात आले होते. सदर मार्गावर एकूण 11 स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे.  मार्ग क्र. 1 ची अंमलबजावणी करण्याकरिता अभियांत्रिकी सहाय्य म्हणून सिडकोतर्फे महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. मार्ग क्र. १ वर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, ईमर्जन्सी ब्रेक इ. चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या व त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. तद्नंतर मेट्रोच्या वाणिज्यिक परिचालनाकरिता (commercial operation) सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडून मार्ग क्र. 1 वर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले असून 17 नोव्हेंबर 2023 पासून सदर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. 

हेही वाचा :  भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

मेट्रो स्थानकांवर खास व्यवस्था

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि  निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर  पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 

असं आहे मेट्रोचे वेळापत्रक आणि तिकीट

ही मेट्रो सेवा दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी 3.00 वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री  10 वाजता असणार आहे. तर, दिनांक18 नोव्हेंबर 2023 पासून पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता होणार आहे. या मार्गावर दर 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. 
या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे 0 ते 2 किमीच्या टप्प्याकरिता 10 रुपये, 2 ते 4 किमीकरिता 15 रुपये, 4 ते 6 किमीकरिता 20 रुपये, 6 ते 8 किमीकरिता 25 रुपये, 8 ते 10 किमीकरिता 30 आणि 10 किमीपुढील अंतराकरिता 40 रुपये असा तिकीट दर असणार आहे.

हेही वाचा :  तुमचा विश्वास बसणार नाही पण ट्रेनमध्ये असतात तब्बल 11 प्रकारचे हॉर्न! जाणून घ्या नेमका अर्थ

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भाव

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला …

Pune Porshce Accident : ‘व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा’, अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली…

Pune Porsche Car Accident Mother Reaction : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात …