शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आज अलिबाग येथे पार पडली.
“अडीच वर्षे खूप सहन केले आहे. आता मात्र पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. शिवसेना आमदारांच्या कामांचे श्रेयही पालकमंत्री घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र हे सहन केले जाणार नाही.” असं सांगत, “कोणी पण द्या पण रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्या.”, अशी मागणी शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीने एकमुखाने केली आणि सत्तेत असून होणारी घुसमट त्यांनी जाहीररित्या बोलून दाखवली. तसेच, “यापुढे शिवसेनेला अंगावर घ्याल तर सोडणार नाही, सुधारा अन्यथा जिल्ह्यातून हद्दपार करू.” असा इशारा रायगडच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिला आहे.
माणगाव नगरपंचायत निवडणूकीनंतर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री आदिती तटकरे हटावचा नारा दिला होता. या पार्श्वभुमीवर शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आज (गुरुवार) अलिबाग येथे पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह तीनही जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत गोगावले यांनी घेतलेल्या पालकमंत्री हटावा या मागणीला सर्वानुमते पाठींबा देण्यात आला. शिवसेनेचे आमदार आणि जिल्हा प्रमुख यावेळी तटकरेंविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
…पण आमच्या घरात कोणी डोकविण्याचा प्रय़त्न केला तर… –
“पालकमंत्री सातत्याने शिवसेना आमदारांच्या मतदार संघात ढवळाढवळ करत आहेत. आमच्या मतदारसंघात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नियोजन मंडळाच्या निधीतून शिवसेनेकडून मंजूर झालेली कामे अडविण्याचा प्रयत्न करत आहेत. पालकमंत्र्यांनी पालकाच्या भुमिकेतून जिल्ह्याचा कारभार संभाळायला हवा, पण तसे होत नाही. आता सहनशीलता संपली आहे. आम्ही दुसऱ्यांच्या घरात डोकवत नाही पण आमच्या घरात कोणी डोकविण्याचा प्रय़त्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमचे म्हणणे आम्ही मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांकडे निवेदनाच्या माध्यमातून मांडणार आहोत.” असे मत यावेळी आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले.
अन्यथा शेकाप प्रमाणे तुम्हालाही रायगडातून हद्दपार करू –
बैठकीच्या सुरवातीला आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. “शेकापचा आज जिल्ह्यात एकही आमदार नाही. तुमचा एक आहे. त्यामुळे वेळीच सुधारा अन्यथा शेकाप प्रमाणे तुम्हालाही रायगडातून हद्दपार करू.” असा इशारा त्यांनी दिला. तर पालकमंत्री हटविल्याशिवाय आता गप्प बसणार नाही, श्रीवर्धनचा पुढचा आमदारही शिवसेनेचाच असेल असे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी म्हटले. माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनीही पालकमंत्री हटवण्याची मागणीचे यावेळी समर्थन केले.
…त्याप्रमाणे आता आमच्या पालकमंत्र्यांची बदली करा –
“राज्यात आघाडीचे सरकार टिकले पाहीजे आम्हालाही वाटते. परंतु रायगडच्या पालकमंत्री शिवसेनेवर अन्याय करत आहेत किती सहन करायचे, ज्या प्रमाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांची दोन वर्षांनी बदली होते. त्याप्रमाणे आता आमच्या पालकमंत्र्यांची बदली करा आणि शिवसेनेचा पालकमंत्री द्या अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आमची म्हणणे मांडणार आहोत.” असं शिवसेना आमदार भरत गोगावले म्हणाल आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.