“डोळे बंद करुन फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं?” असा सवाल देखील केला आहे.
राज्यात डोळे बंद करून फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं? असा प्रश्न उपस्थित करत, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “सत्ता नसल्याने त्यांना वैफल्य आलं आहे.” असं म्हणत टोलाही लगावला आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज(रविवार) चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना विविध मुद्य्यांवर प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडीवर केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी म्हटले की, “देवेंद्र फडणवीस यांना सत्ता नसल्यामुळे वैफल्य आले आहे. त्यामुळेच ते कधी मुख्यमंत्र्यांवर बोलतात तर कधी सरकार कुठेच दिसत नाही, असं म्हणत असतात. त्यांना आपलं सरकार येईल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, असं सतत वाटत असतं. ही त्यांची उद्विग्नता आहे.”
राज्यात सरकार कुठेच दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली होती. फडणवीसांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. उघडे डोळए असते तर सरकार दिसलं असतं. सरकारवर प्रेम करणारी लोकं दिसली असती. पण डोळे बंद करुन फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं?, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. सत्तेतील तिन्ही पक्ष आनंदाने एकत्र आहोत. कोणताही वाद नाही. मिळून अन्यायाविरुद्ध लढा देऊ, असंही आदित्य ठाकरे सांगायला विसरले नाही.
मंत्री आदित्य ठाकरे यांना आज चंद्रपुरात ढेपाळलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा सामना करावा लागला. स्थानिक ऐतिहासिक रामाळा तलावाच्या खोलीकरण कामाच्या पाहणीसाठी आदित्य घटनास्थळी पोचले. तेव्हा तिथे अनावश्यक लोकांची एकच झुंबड उडाली. कार्यक्रम हा सार्वजनिक नव्हता किंवा तिथे त्यांचे भाषणही नव्हते. त्यामुळे अवांतर गर्दी तिथे टाळता आली असती. पण पोलीस यंत्रणेने तशी कोणतीही व्यवस्था न केल्याने स्थानिक नागरिकांची तोबा गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असण्यासोबतच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील आहेत. त्यांना दिली जाणारी सुरक्षा चोख असायला हवी होती. मात्र त्यांना अनावश्यक गर्दीने गराडा घातला, सोबतच अनेकजण केवळ सेल्फीसाठी त्यांच्या जवळ जात होते. हे चित्र आदित्य यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.