युवा प्रज्ञावंतांना तज्ज्ञांची दाद; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांची घोषणा लवकरच | Loksatta Tarun Tejankit awards announced soon akp 94


करोना साथीच्या आव्हानात्मक काळातही राज्यातील तरुण वर्ग भविष्याविषयी आशावादी दृष्टिकोन बाळगतानाच, विविध क्षेत्रांमध्ये अविरत काम करत आहे

मुंबई : विविध समाजोपयोगी कामांमध्ये झोकून देत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या युवांमधील ऊर्जा, उद्यमशीलता, जिद्द आणि प्रज्ञेला गौरविणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या चौथ्या पर्वातील विजेत्यांची निवड विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या परीक्षक समितीने केली असून लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा रंगणार आहे. करोनाने गेली जवळपास दोन वर्षे जीवनमान थिजवून टाकलेले असतानाही, काही तरुणी आणि तरुण प्रेरणाधीन कार्यमग्नतेतून आपल्या लक्ष्याकडे ज्या सातत्याने वाटचाल करत राहिले, त्याने निवड समिती विशेष प्रभावित झाली.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२१’ या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश आळेकर, ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रियदर्शनी कर्वे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आणि ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी या मान्यवरांच्या समितीने केली आहे.

करोना साथीच्या आव्हानात्मक काळातही राज्यातील तरुण वर्ग भविष्याविषयी आशावादी दृष्टिकोन बाळगतानाच, विविध क्षेत्रांमध्ये अविरत काम करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन, क्रीडा, उद्योग आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत कर्तृत्वाची नवी क्षितिजे गाठणाऱ्या तरुणांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छाननी केलेल्या अर्जातून विजेत्यांची निवड करताना कामाची दिशा, प्रेरणा, सातत्य, नवसंकल्पना, मूलभूतता अशा तेजांकित ठरविणाऱ्या विविध घटकांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सुमारे तीन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या बैठकीमध्ये गुणवंतांच्या कामगिरीसोबतच त्या-त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कामांमुळे स्थानिक परिणामांसह वैश्विक परिप्रेक्ष्यातील परिणामांचाही आढावा घेण्यात आला. अर्जाची प्राथमिक छाननी करण्याची जबाबदारी पीडब्ल्यूसीने पार पाडली.

नवीन पिढी अधिक सक्षम

भारत हा तरुण मंडळींचा देश आहे. त्यामुळे तरुण पिढीच्या मेहनतीमुळे समाजाची प्रगती होत असते. नवे काहीतरी स्वत:हून करून दाखवणाऱ्या तरुणांची गाथा मांडून इतर अनेकांना प्रेरणा देण्याचे काम ‘तरुण तेजांकित’ या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने उत्तम प्रकारे साध्य केले आहे. खूप तरुण मंडळी विविध क्षेत्रांत काम करत असतात आणि त्यांपासून अनेक जण स्फूर्ती घेत असतात. ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि असायला हवी. यात ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाचे योगदान खूप मोठे आहे. विजेत्यांची निवड करताना परीक्षकांच्या आपापसातल्या विचारविनिमयातून आणि त्यातून अजून काही माहिती हवी असल्यास ती गोळा करून विजेते निवडण्यात आले. या प्रक्रियेत तसे पाहिले तर जटिलता आहे कारण उद्योग, समाजकार्य, विज्ञान, क्रीडा अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत, शिवाय त्यांतही स्वतंत्र उपविभाग असतात. यांची तुलना करणे म्हणजे इंग्रजीत आपण ज्याला अ‍ॅपल्स आणि ऑरेंजेसमध्ये तुलना करणे म्हणतो, तसेच. समाजासमोर कशी उदाहरणे ठेवायची आहेत त्याचा विचार करून निवड करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. नवीन आव्हानांना सामोरे जात आपण त्यातून नवीन संकल्पना कशा आणू शकतो याचा विचार या उपक्रमातून तरुणांमार्फत केला जाऊ शकतो. नव्या पिढीसमोर आधीच्या पिढीपेक्षा जास्त आव्हाने आहेत. त्याचसोबत जास्त क्षमताही आहे. तरुण पिढीच्या क्षमतेबद्दल मला पूर्णत: खात्री आहे आणि येणारी नवीन आव्हानेसुद्धा ही नवी पिढी पेलू शकते यावर मला विश्वास आहे. – डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ (निवड समितीचे अध्यक्ष)

हेही वाचा :  Ambani-Adani-Tata यांच्यामुळे एशियन गेम्समध्ये भारताला मिळाले 107 मेडल

कौशल्याला नवी ओळख

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून तरुणांच्या कौशल्याला नवी ओळख मिळते. कला, उद्योग, क्रीडा, समाजसेवा या प्रत्येक क्षेत्रातील तरुणांच्या कार्याचे मूल्यमापन करताना कामाची व्याप्ती आणि सामाजिक जाणीव यांचा विचार करून त्यानुसार निवड करण्यात आली आहे. ‘तरुण तेजांकित’च्या नव्या पर्वासाठी ‘लोकसत्ता’ला मन:पूर्वक शुभेच्छा.  डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी

अंतिम निवड आव्हानात्मक

‘तरुण तेजांकित’ हा ‘लोकसत्ता’तर्फे राबवला जाणारा एक वैशिष्टय़पूर्ण उपक्रम आहे. अनेक तरुण आपापल्या क्षेत्रात समर्पित भावनेतून काम करत असतात. पण कुणीतरी जेव्हा त्यांची दखल घेते त्या वेळी निश्चितच त्यांची कामावरील श्रद्धा वाढते. गेली दोन वर्षे ‘तरुण तेजांकित’साठी मला परीक्षक म्हणून येण्याची संधी लाभली. या पुरस्कारासाठी केली जाणारी निवडप्रक्रिया ही अगदी पारदर्शी असून त्याची मांडणी विचारपूर्वक केली आहे. प्रभावी पद्धतीने आणि नव्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी तरुण काम करतात. ही निवडप्रक्रियाही अतिशय कठीण होती. अत्यंत तोलमोलाचे काम करणाऱ्या तरुणांच्या प्रवेशिका आल्या होत्या त्यामुळे नक्की कोणाची निवड करायची, हा प्रश्न सगळय़ांसमोरच होता. परंतु त्यातही प्रेरणादायी आणि नवनिर्मितीच्या संकल्पना असणाऱ्या तरुणाईची निवड केली आहे. ज्यांची निवड झाली नाही अशांच्याही प्रतिभेचा आम्ही विचार केला. ज्यांना पुरस्कार मिळाला नाही पण त्यांचे कार्य अतिशय सकस असे आहे त्यांना ‘लोकसत्ता’तून प्रसिद्धी देण्याचा विचार व्हावा. ‘सर्वकार्येषु सर्वदा’सारख्या व्यासपीठावरूनही या तरुणांना संधी देण्यात आली तर त्यांना अजून चांगला वाव मिळेल.  – डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहालय

हेही वाचा :  मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?

ही नवी सांस्कृतिक परंपरा

१९९० नंतर, म्हणजे जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली ही पिढी आज आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवते आहे. आर्थिक उदारीकरणाच्या काळात त्यांचे शिक्षण झाले आहे, त्यातून आज सगळे काही डिजिटल आहे. या सगळय़ातून ही तरुण पिढी काय नवीन विचार घेऊन येते आणि त्याचा फायदा नव्या पिढीकरिता कसा होऊ शकतो याची एक चुणुक ‘तरुण तेजांकित’ या उपक्रमातून दिसते. या वर्षीची निवड प्रक्रिया व्यापक होती परंतु संयोजकांनी ती प्रक्रिया अधिक सुलभ केली. प्रत्येक उमेदवाराची माहिती आणि मर्मस्थान जलदगतीने समजून घेता आले, कारण आम्हाला दिलेल्या माहितीचे अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे पृथक्करण आमच्यापुढे केले होते. निवडप्रक्रिया संपूर्ण पारदर्शी पद्धतीने झाली, याबाबत संयोजकांचे कौतुक करायला हवे. ‘तरुण तेजांकित’ ही एक नवीन सांस्कृतिक परंपरा आहे, ती जशी वाढत जाईल तशी या उपक्रमाची वेगळी छाप सांस्कृतिक पटलावर उमटेल असा मला विश्वास वाटतो.  – डॉ. सतीश आळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी

अत्यंत आदर्श निवडप्रक्रिया

माझे हे ‘तरुण तेजांकित’च्या निवड समितीतील तिसरे वर्ष आहे. वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मंडळी एकत्र येऊन या पुरस्कारासाठी तरुणांची निवड करतात ही बाब मला विशेष महत्त्वाची वाटते. एरवी ज्यांचा ज्या क्षेत्रात अभ्यास आहे तेच त्यांच्या क्षेत्रातील विजेत्यांची निवड करतात, पण त्याहीपेक्षा वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मंडळींनी एकत्र येऊन सर्वागीण विचार करून मतप्रदर्शन करणे या दोघांमध्येच खूप मोठा फरक आहे. आजच्या काळात वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मंडळींनी एकत्र येऊन विजेत्यांची निवड करणे हे गुणात्मकदृष्टय़ा फार आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ या तरुणांना मिळाले आहे सोबतच योग्य वयात त्यांना शाबासकीही मिळते आहे. तरुणांनी सतत विविध वाटा शोधाव्या असे मी या निमित्ताने सांगेन. आपल्या कामाची दिशा स्पष्ट झाली की स्वत:ला तपासण्याची संधी या उपक्रमातून नक्की मिळेलच, शिवाय त्याचा फायदा समाजालाही होईल, असे वाटते. तेव्हा या व्यासपीठाचा तरुणांनी नक्कीच लाभ घ्यावा.  – डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, ज्येष्ठ संशोधक

हेही वाचा :  उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, एकाही घोटाळेबाजाला सोडणार नाही - किरीट सोमय्या

अभिमानास्पद उपक्रम

गेली चार वर्षे ‘पीडब्ल्यूसी’ ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’शी संलग्न आहे. नामांकनांची प्रक्रिया, त्यानंतर परीक्षकांची निवड आणि पुरस्कारासाठी विजेत्यांची निवडप्रक्रिया या सर्वात आम्ही सहभागी असतो. या वर्षी ‘तरुण तेजांकित’ला खूप चांगला प्रतिसाद उमेदवारांकडून मिळाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही अपेक्षा नव्हती. निवड समितीनेही चांगल्या प्रकारे ही प्रक्रिया हाताळली आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून इतक्या वैविध्यपूर्ण गुणवत्तेकडे पाहाताना अभिमान वाटतो. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या सर्व विजेत्यांना मी शुभेच्छा देतो.

          – सुभाष पाटील, पीडब्ल्यूसी

प्रायोजक

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) 

  सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., वल्र्ड वेब सोल्यूशन्स,

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, झी मराठी

  पॉवर्ड बाय : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.

  नॉलेज पार्टनर : प्राइस वॉटरहाऊस कूपर्स

  टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …