Breaking News

‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी..’, अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, ‘नव्या मोगलांना..’

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचासंदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बाळाहेबांच्या राजकारणाचासंदर्भ देत सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर ठाकरे गटाने कटाक्ष टाकला आहे. “श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील,” असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील

“संपूर्ण देश राममय झाला असताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आज साजरा होत आहे. हा मंगल योग आहे. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येत पार पडला. श्रीरामांचा जन्म अयोध्येतच झाला व अयोध्या रामाचीच हे ठासून सांगणाऱ्या व त्यासाठी उसळलेल्या आंदोलनात संघर्षाच्या समिधा टाकणाऱ्या नेत्यांत शिवसेनाप्रमुखांचे नाव सर्वोच्च आहे. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वास याची कृतज्ञता नसली तरी भगवान श्रीरामाने मंदिर प्रवेशासाठी संकल्प योजला तो 22 जानेवारीस म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येस. हा योगायोगाचा अपूर्व संगम आहे. अयोध्येतील श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील. देश आज राममय झाला तो एका राजकीय रचनेचादेखील भाग आहे. पण देशात रामराज्य आले आहे काय?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

आज शिवसेनाप्रमुख हवेच होते

“श्रीरामांना घर मिळाले, पण देशातील लाखो लोक बेघर आणि उपाशी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामांसाठी उपवास धरला, पण देशातील कोट्यवधी जनतेची उपासमार दूर व्हावी यासाठी ते उपवास करणार आहेत काय? रामाचे नाव घेऊन देशाला फक्त ‘मोदी मोदी’ करायला लावणे हाच अयोध्या उत्सवाचा भाजपाई उद्देश असावा व या ढोंगबाजीचा मुखवटा उतरवण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख हवेच होते,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. “शिवसेनाप्रमुखांचे अस्तित्व हे सत्य व नैतिकतेच्या राजकारणाचे बलस्थान होते. आज आपल्या देशातून सत्य आणि नैतिकतेचे उच्चाटन झाले आहे व राष्ट्रभक्तीचा गोवर्धन करंगळीवर पेलून धरायला शिवसेनाप्रमुख नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही महाराष्ट्र मोगलांशी लढत राहिला व शेवटी औरंगजेबाला याच मातीत गाडले. शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाणानंतरही महाराष्ट्र लढतच आहे व महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या नव्या मोगलांना तो याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनाप्रमुख ही पदवी किंवा उपाधी नव्हती, तर ते एक तेजोवलय होते,” असा उल्लेख लेखात आहे.

हेही वाचा :  Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी; पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव!

सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी…

“सत्तेपेक्षा संघटनेचे बळ किती मोलाचे व संघटनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या निष्ठा व त्याग किती महत्त्वाचा, हे त्यांनी देशाला दाखविले. लाखो निष्ठावंतांचा सागर त्यांच्या एका इशाऱ्यावर उसळून बाहेर पडत असे व देशाच्या राजकारणाची दिशा त्यामुळे बदलत असे. हा इतिहास कधीच पुसला जाणार नाही. ‘शिवसेनाप्रमुख’ या पदातील शिवसेना मोदी-शहांच्या भारतीय जनता पक्षाने सध्या महाराष्ट्रद्रोही गुलामांच्या हाती सोपवली आहे. सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ‘महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..’; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना

बाळासाहेबांकडून अनेकदा विधायक हुकूमशाहीचे समर्थन

“महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी केली. पण महाराष्ट्राची लूट विनासायास करता यावी यासाठी बाळासाहेबांची शिवसेना ‘गुजरात लॉबी’ने फोडली, पण शिवसेना संपली काय? ती महाराष्ट्राच्या कणाकणांत आहे, मनामनात आहे. श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील. बाळासाहेब ठाकरे हे या भूतलावर जन्मलेले असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अल्बर्ट आइनस्टाईन महात्मा गांधींविषयी जे म्हणाले होते, तेच वेगळ्या शब्दांत बाळासाहेब ठाकरेंविषयी म्हणावे लागेल. आइनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते, ‘येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता.’ गांधींच्या अनेक विचारांशी आणि भूमिकांशी शिवसेनाप्रमुख सहमत नव्हते. ते लोकशाहीपेक्षा शिवरायांच्या शिवशाहीवर विश्वास ठेवणारे होते. जेथच्या तेथे न्याय हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र होते. अनेकदा त्यांनी विधायक हुकूमशाहीचे समर्थन केले ते जनतेला न्याय मिळावा म्हणून. ‘करतो, पाहतो, बघू, उद्या या’ या प्रशासकीय शब्दांवर लालफीतशाहीचा दोरखंड आवळलेला होता. तो तोडून जनतेला न्याय देण्यासाठी त्यांना शिवशाहीचे प्रशासन हवे होते,” असं म्हणत ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा :  Shocking News: नशिबामुळे नाही तर वैज्ञानिक कारणामुळे वाचला जीव; रेल्वे ट्रॅकवर आडवा झाला, ट्रेन धडधडत आली पण त्याला साधं खरचटलं देखील नाही

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर…

“बाळासाहेब विरोधकांच्या टीकेचे सदैव धनी होते. तीच त्यांची श्रीमंती होती. लाखो लोकांचा जनसागर त्यांचा जयजयकार करीत असे. हेच त्यांचे भांडवल होते. त्यांनी कारखाने, उद्योग, निर्माण केले नाहीत; पण मुंबई, महाराष्ट्रातील उद्योगांना संरक्षण देऊन लाखो, कोट्यवधी मराठी तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून दिला. मराठी माणसाची चूल त्यांनी सतत पेटत ठेवली. म्हणूनच गांधींप्रमाणेच हाडामांसाचा असा मनुष्य बाळ केशव ठाकरे नावाने या महाराष्ट्रात वावरत होता, यावर येणाऱ्या पिढ्यांना विश्वास ठेवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदूंची सुंता झाली असती. काशी-मथुरेच्या मशिदी झाल्या असत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मराठी माणूस कायमचा गुलाम झाला असता. मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पडला असता. महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीमोल झाला असता. महाराष्ट्र आजही दिल्लीतील नव्या मोगलशाहीविरुद्ध लढत आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळेच,” असंही ठाकरे गटाने म्हटलंय.

नक्की पाहा >> Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरात प्रवेश करताना मोदींच्या हातात होतं तरी काय?

…तर त्यांनी ते जंगलच पेटवले असते

“आज सर्व राष्ट्रीय संस्था, न्यायालये, संविधानाचे चौकीदार, निवडणूक आयोग, राजभवन सरकारच्या हातातील बाहुले बनून कठपुतळ्यांप्रमाणे नाचत आहेत. देश इराणच्या खोमेनीप्रमाणे धर्मांधता आणि उन्मादाच्या दिशेने निघाला आहे. राष्ट्रवादाच्या व्याख्या बदलल्या आहेत. पाकिस्तानबरोबर चीनही दुष्मन बनून छातीवर बसला आहे. हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धर्मांधता नाही, असा विचार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. पण देश ‘राममय’ करताना त्या हिंदुत्वात धर्मांधतेची अफू मिसळली जात असेल तर हा महान भारत देश पुन्हा जंगलयुगात जाईल. देशाचे जंगल होताना पाहणे दुर्दैव आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ते जंगलच पेटवले असते. तरीही बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिणग्या जंगलराज्यात उडत आहेत. या ठिणग्याच जंगलराजला चूड लावतील! बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या ठिणग्या म्हणजे निखाराच आहे. त्या कशा विझतील?” असं म्हणत लेखाचा शेवट करण्यात आला आहे. 

हेही वाचा :  Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर हेतू साध्य होणार नाही,’ सुप्रीम कोर्टाचा अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार; पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय चर्चेत

पुण्यात बेदरकारपणे कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन चालकाला कोर्टाने जामीन दिल्यानंतर नाराजी व्यक्त …

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …