The Kashmir Files च्या दिग्दर्शकाला मोदी सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा; CRPF सहीत ११ जवान करणार तैनात | The Kashmir Files Director Vivek Agnihotri has been given Y category security by central Government scsg 91


‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे मागील काही दिवसांपासून ते फारच चर्चेत असून याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.

देशामध्ये सध्या तुफान चर्चेत असणाऱ्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासंदर्भात केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणारा वाद लक्षात घेत विवेक अग्निहोत्री यांना केंद्राने व्हाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना व्हाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचं कडं यापुढे विवेक अग्निहोत्री यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतामध्ये विवेक अग्निहोत्री यांना ही सुरक्षा पुरवली जाणार आहे,’ असं सुत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय.

अग्निहोत्रींना का पुरवण्यात आलीय सुरक्षा?
सध्या ‘द काश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी तसेच अभिनेत्री पल्लवी जोशी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत आहेत. अनेक मान्यवरांना ते मागील काही दिवसांमध्ये भेटलेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यासारख्या अती महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच मोहन भागवत यांनीही विवेक अग्निहोत्रीनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपाटाचं तोंडभरुन कौतुक केलंय. पंतप्रधानांनी तर या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोलही सुनावले आहेत. भाजपाची सत्ता असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्सी फ्री करण्यात आलाय. मात्र त्याचवेळी काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटावरुन बराच वाद सुरु आहे. एकीकडून या चित्रपटाला पाठिंबा मिळत असला तरी दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. त्यामुळेच ही सुरक्षा पुरवण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

कोणाला सुरक्षा पुरवली जाते?

प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना आधी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच होते. पण आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. परिस्थितीनुसार, सुरक्षेचा आढावा घेऊन सरकारकडून व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दर्जामध्ये बदल केला जातो. मध्यंतरी शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

हेही वाचा :  तीन महिन्यात ही नगरी मंदिराची की गुन्हेगारांची

कोणालाही धमकी मिळाली किंवा जिवाला धोका असेल तर अशाप्रकारची सुरक्षा पुरवली जाते का?

नाही, अशाप्रकारची सुरक्षा ही धमकी मिळाल्याच्या आधारावर पुरवली जात नाही. या अशा सुरक्षेला अनधिकृतपणे ‘व्हिआयपी सुरक्षा’ म्हणजेच अती महत्वाच्या व्यक्तींना मिळणारी सुरक्षा असं म्हटलं जातं. त्यामुळेच ही सुरक्षा सामान्यपणे मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या किंवा एखाद्या क्षेत्रातील अती महत्वाच्या व्यक्तींनाच पुरवली जाते.

सामान्यपणे महत्वाच्या व्यक्तींनाही सुरक्षा पुरवण्याआधी केंद्र सरकार अनेक गोष्टींचा विचार करते आणि त्यानंतरच सुरक्षा पुरवते. राज्यातील पोलिसांबरोबरच इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने ही सुरक्षा महत्वाच्या व्यक्तींना पुरवली जाते. सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना मागील वर्षी म्हणजेच २०२१ साली एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अशाप्रकारची वाय दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश केंद्राने दिले होते.

कोण कोणत्या दर्जाची सुरक्षा असते आणि त्यामध्ये किती सुरक्षा रक्षक असतात?

झेड सुरक्षा –
झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये २२ जण सुरक्षेसाठी तैनात असतात. यात चार ते पाच एनएसजी कमांडो असतात. राज्य सरकार किंवा सीआरपीएफकडून अतिरिक्त सुरक्षा दिली जाते. या कॅटेगरीतील कमांडो सबमशीन गन आणि संवादाच्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असतात. त्याशिवाय हे कमांडो मार्शल आर्ट आणि विनाशस्त्र लढण्याच्या कौशल्याने सुसज्ज असतात.

झेड प्लस सुरक्षा –
झेड प्लस कॅटेगरीमध्ये सुरक्षेसाठी ३६ जण तैनात असतात. यात दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. एसपीजी नंतर हे दुसऱ्या दर्जाचे सुरक्षा कवच आहे. सर्व कमांडोज अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि उपकरणांनी सुसज्ज असतात.

वाय सुरक्षा –
या कॅटेगरीत येणाऱ्या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी ११ सुरक्षारक्षक तैनात केले जातात. यात दोन कमांडोज, दोन पीएसओ असतात.

वाय प्लस सुरक्षा –
या कॅटेगरीमध्ये कंगनाच्या सुरक्षेसाठी १० सशस्त्र कमांडो तैनात असतात.

एक्स सुरक्षा –
या कॅटेगरीतंर्गत फक्त दोन जण सुरक्षेसाठी दिले जातात. हे खूप सामान्य दर्जाचे सुरक्षाकवच आहे.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) –
एसपीजी सुरक्षेबाबत बरीच गोपनीयता बाळगली जाते. विद्यमान आणि माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा प्रदान केली जाते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८८ साली एसपीजीची स्थापना करण्यात आली. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एसपीजीची सुरक्षा आहे.

हेही वाचा :  Kangana Ranaut : श्रद्धा वालकर प्रकरणामुळे बॉलिवूडची पंगाक्वीन दुखावली

केंद्र सरकारने एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवली जावी हे कसं ठरतं?

एखाद्या व्यक्तीला कोणत्याप्रकारची सुरक्षा पुरवली जावी याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेतं. मात्र हा निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांकडून म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच ‘आयबी’ आणि रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’चा सल्ला घेतला जातो.

एखाद्या महत्वाच्या व्यक्तीच्या जीवाला धोका असेल किंवा काही घातपात होण्याची शक्यता असेल तर अशी सुरक्षा पुरवली जाते. सामान्यपणे दहशतवादी किंवा गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार एखाद्या गटाकडून अशा व्यक्तींच्या जीवाला धोका असल्याचे संकेत मिळाल्यास सुरक्षा पुरवली जाते. अशी माहिती फोन कॉल रेकॉर्ड्स, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती किंवा थेट बातम्यांच्या संदर्भातून संबंधित यंत्रणांना मिळते. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करुनच या यंत्रणा सुरक्षेसंदर्भातील सल्ला केंद्रीय गृहमंत्रालयाला देतात.

अनेकदा एखाद्या सरकारी हुद्द्यावर किंवा पदावर असणाऱ्या व्यक्तींला त्या पदावर असल्यामुळे सुरक्षा पुरवलीच जाते. यामध्ये राष्ट्रपतींबरोबरच पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तींचा समावेश होतो. सामान्यपणे केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणाऱ्या व्यक्तीलाही अशाप्रकारची सुरक्षा महत्वाचं पद असण्याबरोबरच पदाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सुरक्षा पुरवली जाते.

कोणत्या सुरक्षा यंत्रणा अशी सुरक्षा पुरवतात?

पंतप्रधान वगळता इतर महत्वाच्या व्यक्तींना राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एनएसजी, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफच्या माध्यमातून सुरक्षा पुरवली जाते.

एनएसजीवर अती महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमुळे जो दबाव पडत आहे तो कमी करण्यासाठी मागील काही वर्षांपासून काम करत आहे. एनएसजीच्या कमांडोजला दहशतवाद्यांविरोधातील कारवायांमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या कामात अडकवून ठेवलं जाऊ नये असा युक्तीवाद एनएसजी कमांडोजवरील सुरक्षेचा दबाव कमी करण्यासंदर्भात दिला जातो. याच कारणामुळे केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना केंद्रीय राज्य राखीव दलाकडून तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सीआयएसएफची सुरक्षा पुरवली जाते. या दोघांनाही एनएसजीची सुरक्षा पुरवली जात नाही.

हेही वाचा :  विवाह 2.0! नवरीमुलगी लग्नाच्या आधीच पडली आजारी, नवरा वरात घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्...

पैसे कोण भरतं?

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा केंद्र सरकार एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवते तेव्हा ती मोफत पुरवली जाते. मात्र ज्यांना झेड किंवा झेड प्लससारखी जास्त सुरक्षा पुरवली जाते आणि ही सुरक्षा त्या व्यक्तींच्या राहत्या घराभोवती किंवा प्रवासादरम्यानही पुरवली जात असेल तर सुरक्षा यंत्रणेतील व्यक्तींच्या राहण्याची सोय या व्यक्तींनाच करावी लागते.

देशाचे माजी सरन्यायाधीश पी. सतशीवम यांनी २०१४ साली निवृत्तीनंतर सरकारकडून पुरवण्यात आलेली व्हीआयपी सुरक्षा नाकारली होती. निवृत्तीनंतर ते आपल्या गावच्या घरी रहायला गेल्याने तिथे सुरक्षा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. सरन्यायाधीश असतानाच त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. निवृत्तीनंतर ती झेड दर्जाची करण्यात आली. झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये २२ जण सुरक्षेसाठी तैनात असतात.

ही सुरक्षा मोफत पुरवली जात असली तरी सरकार काही व्यक्तींना धमक्यांच्या आधारे सुरक्षा पुरवण्यात आली तरी पेड सिक्युरीटी म्हणजेच सुरक्षेच्या मोबदल्यात पैसे घेण्यात निर्णय घेऊ शकते. आयबीने २०१३ साली उद्योजक मुकेश अंबानी यांना मिळालेल्या धमकीच्या आधारे त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही सुरक्षा देताना सरकारने अंबानींकडून महिन्याला १५ लाख रुपये फी घेण्याची सुचना केली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …