ज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, ’20 हजार कोटी…’

New Parliament Building Advice Of Astrologer: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवीन संसदेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान म्हणून मोदींनी पहिल्यांदा 2014 मध्ये संसदेच्या वास्तूमध्ये पायरीवर डोकं टेकवून प्रवेश केला होता असा उल्लेख केला आहे. ‘मोदी यांनी श्रद्धेने माथे टेकवले व हे सर्व ढोंग आहे असे तेव्हा वाटले नाही,’ असं राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरामधील लेखात म्हटलं आहे. “ऐतिहासिक संसद भवनास टाळे लागले आहे. तेथे संविधानाचे म्युझियम वगैरे होईल असे सांगितले जाते. नवी इमारत म्हणजे आज तरी गोंधळ दिसत आहे. तेथे इतिहास घडेल काय? त्यासाठी लागणारी टोलेजंग व्यक्तिमत्त्वेच आज नाहीत! जुन्या संसद भवनास विसरता येणे कठीण आहे,” असं राऊत यांनी लेखाच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

मोदींच्या मनात आले म्हणून…

“राजधानी दिल्लीतील हिंदुस्थानचे संसद भवन दिमाखात उभे आहे. आणखी किमान 100 वर्षे त्या भव्य वास्तूस साधा तडाही गेला नसता, पण पंतप्रधान मोदी यांच्या मनात आले म्हणून त्यांनी दिमाखदार ऐतिहासिक ‘संसद भवना’ला टाळे लावले व त्याच आवारात नवे संसद भवन उभे केले. 20 तारखेला विशेष अधिवेशनासाठी मी नव्या संसद भवनात पोहोचलो तेव्हा बाहेर व आत एकंदरीत गोंधळाचेच चित्र होते. जुन्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी लोकसभा तसेच राज्यसभेसाठी स्वतंत्र भव्य दरवाजे होते. लोकसभेसाठी इतर ‘2’ दरवाजे पंतप्रधान व उपराष्ट्रपतींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्यामुळे अधिवेशन काळात कधीच अव्यवस्था दिसली नाही. नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेसाठी एकच ‘दार’. त्यामुळे सुरुवातीपासून गोंधळास सुरुवात होते. आत शिरताच एका परिचित पत्रकाराने विचारले, “नवे संसद भवन कसे वाटले?” “हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेला शोभेल असे हे संसद भवन अजिबात वाटत नाही. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या लोकशाही मंदिरात प्रवेश केल्यासारखे वाटत नाही,” असे माझे त्यावर उत्तर होते,” असंही राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

हे भारतमातेस ‘वृद्ध’ झाल्याचे सांगण्यासारखे

“दिल्लीत सध्या घामाच्या धारा वाहत आहेत असा उन्हाळा आहे. त्या उन्हात खासदार व कर्मचारी आत शिरण्यासाठी उभे आहेत. लोकसभेला आधी होते तसे दिमाखदार पोर्च येथे नाही. जुने संसद भवन व्यवस्थित आहे. तरीही समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून त्यावर सरकारी तिजोरीतून 20 हजार कोटी रुपये उधळले. हा सर्व अट्टहास कशासाठी? “स्वातंत्र्यानंतर या इमारतीस संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता हे खरे आहे, पण या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा घाम, मेहनत आणि पैसाही आपल्या देशाने गुंतवला,” असे पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या निरोपाच्या भाषणात सांगितले. संसद भवन ही प्रेरणादायी व तजेलदार वास्तू असते. अशा इमारती वृद्ध व जर्जर होत नाहीत. त्यांना बाद करणे भारतमातेस ‘वृद्ध’ झाल्याचे सांगत वृद्धाश्रमात ढकलण्यासारखे आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

हेही वाचा :  Crime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि... जोडप्यासोबत घडली भयानक घटना

गरीबाला श्रीमंतीची चटक लागली की, तो बेफाम होतो, पण श्रीमंती त्यागणाऱ्यांच्या हाती

“संसदेच्या जुन्या इमारतीच्या पायरीवर डोके ठेवून नरेंद्र मोदी यांनी खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. मोदी यांनी श्रद्धेने माथे टेकवले व हे सर्व ढोंग आहे असे तेव्हा वाटले नाही. मोदींच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, ते त्या संसदेच्या पायरीवर पडले. तीच वास्तू मोदींना नकोशी झाली. जुन्या संसद भवनाचा निरोप घेताना मोदी म्हणतात, “रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब मुलगा संसदेत पोहोचला हीच हिंदुस्थानच्या लोकशाहीची ताकद आहे.” मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, पण त्याच संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले. गांधींवर त्यांनी श्रद्धा ठेवली. गरीबाला श्रीमंतीची चटक लागली की, तो बेफाम होतो, पण श्रीमंती त्यागणाऱ्यांच्या हाती देश गेला की, तो भारतमातेच्या गळ्यातील ताईत ठरतो. गेल्या 70 वर्षांत असे अनेक त्यागमूर्ती या जुन्या संसदेने पाहिले. असे त्यागमूर्ती आता निर्माण होणार नाहीत,” असंही लेखात म्हटलं आहे.

खळबळजनक दावा

“आणखी किमान 50 ते 100 वर्षे मजबुतीने उभे राहील असे संसद भवन असताना नव्या संसद भवनाचा घाईघाईने केलेला हा अट्टहास कशासाठी? दिल्लीतील वर्तुळात यावर ज्या चर्चा सुरू आहेत त्या मनोरंजक आहेत. दिल्लीचे सरकार हे अंधश्रद्धा व अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. देश चालवणाऱ्यांच्या मनावर अंधश्रद्धा, ग्रह, कुंडलीचा पगडा आहे. “सध्याचे संसद भवन 10 वर्षांनंतर तुम्हाला धार्जिणे नाही. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ येथे कोणी टिकत नाही. त्यामुळे नव्या संसद भवनाची उभारणी करा” असा ज्योतिषी सल्ला मानून नव्या संसद भवनाची उभारणी 2024 च्या आधी केली. नवी वास्तू गोमुखी असावी असा त्या ज्योतिषाचार्याचा आग्रह होता. त्यानुसार नवी वास्तू झाली,” असा खळबळजनक उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा :  'आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?' राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

हे यापूर्वी कधी घडलं नाही

“एका बाजूला आपल्या वैज्ञानिकांनी चंद्रावर यान उतरवलं व त्याच देशाचे राज्यकर्ते सत्ता जाऊ नये या अंधश्रद्धेतून नवे संसद भवन उभारतात हे चित्र चांगले नाही. संसदेतील प्रेक्षक गॅलऱ्या यावेळी ठरवून गच्च भरवल्या गेल्या. महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना दिल्लीतील शाळांतील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांना बसेस भरून संसदेत आणले. या सर्व शाळा संघ परिवाराशी संबंधित होत्या हे नंतर समजले. नवे संसद भवन हे भाजपचे जणू मुख्यालय, प्रचार केंद्र बनले. प्रेक्षकगृहात जाणाऱ्या महिलांकडून ‘मोदी झिंदाबाद’चे नारे नव्या संसद भवनात देण्यात आले. हे यापूर्वी कधी घडलं नाही. जुनी संसद हे सर्व हतबलतेने पाहत उभी आहे, पण बोलायचे कोणी? दिल्लीत ज्योतिषाचार्य व बुवा-बाबांची चलती आहे. त्यांची छाया नव्या संसदेवरही पडली आहे अशीच चर्चा आहे,” असं राऊत यांनी ‘रोखठोक’मध्ये म्हटलं आहे.

2014 नंतर या सगळ्यांच्या अंमलबजावणीत चुका घडत गेल्या

“जुन्या संसद भवनात भव्य ‘सेंट्रल हॉल’ म्हणजे मध्यवर्ती सभागृह आहे. लोकसभा व राज्यसभेचे सदस्य येथे एकत्र येतात. चहापानाची व्यवस्था येथे आहे. राजकारणापलीकडचे वातावरण येथे अनुभवण्यास मिळते. पक्ष आणि मतभेदांची सर्व जळमटे येथे गळून पडतात व राजकीय विरोधक एकत्र बसून चर्चा करतात. देशातील राजकारणाचे सर्व प्रकारचे ‘गॉसिप’ येथे चालते. त्यात एक प्रकारची गंमत आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण येथे होते. परदेशी राष्ट्राध्यक्ष दिल्लीत येतात तेव्हा येथेच संसदेचे संयुक्त अधिवेशन होते. नव्या संसद भवनात सेंट्रल हॉलची व्यवस्था नाही. संवाद, संपर्कच तोडला गेला. भेटीगाठींवर हे बंधन आहे. लोकसभा व राज्यसभेतील ‘लॉबी’ला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. नव्या संसद भवनात ‘लॉबी’ उडवूनच दिली. विरोधी पक्षनेत्यांचे प्रशस्त दालनही हरवले आहे. ब्रिटिश पार्लमेंट, त्यांचे संविधान, लोकशाहीची प्रतीके आपण स्वीकारली हे खरे, पण 2014 नंतर या सगळ्यांच्या अंमलबजावणीत चुका घडत गेल्या,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

डॉ. आंबेडकर बाहेर पडत होते नि त्यांच्या सन्मानार्थ…

“ब्रिटिशांनी त्यांच्या देशात पार्लमेंट, लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याची जपणूक केली. ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे एक राजवाडा आहे. थेम्स नदीच्या तीरावर तो उभा आहे. राजवाडा म्हणून ज्याचे बांधकाम झाले, त्याचीच पार्लमेंटमध्ये पुढे परिणती झाली, पण तसे करण्याच्या विचाराने राजवाडा बांधला नव्हता. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंटमधील कचेरीत जात तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे अशी त्यांची भावना होत असे. त्या वास्तूला व त्या वास्तूतील ब्रिटिश पार्लमेंटला प्रदीर्घ इतिहास आहे. तसाच इतिहास ब्रिटिशांनी दिल्लीत बांधून दिलेल्या हिंदुस्थानी पार्लमेंटला आहे. ही इमारत म्हणजे राजवाडा नव्हता. इतिहास येथेही घडला. याच पार्लमेंटने अनेक धक्के पचवले. जसे अतिरेक्यांचे हल्ले पचवून ती उभीच राहिली, अनेक टोलेजंग पंतप्रधान घडवले, तसे अनेकांच्या राजीनाम्याचे हादरेही सहन केले. 27 डिसेंबर 1951 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा याच इमारतीमध्ये राजीनामा दिला. हिंदू संहिता विधेयक हे अर्थातच प्रमुख निमित्त या राजीनाम्यामागे होते. सभागृहात डॉ. आंबेडकरांनी गर्जना केली, “यापुढे मी मंत्री नाही. कोणत्याही प्रकारच्या अरेरावीस शरण जाण्याची माझी इच्छा नाही” आणि आपली कागदपत्रे गोळा करून ते बाहेर पडले. डॉ. आंबेडकर बाहेर पडत होते नि त्यांच्या सन्मानार्थ लोकसभा सदस्यांनी वाजविलेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह गुंजत होते,” असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

हेही वाचा :  Chandrayaan 3 Landing: कसं काम करणार चांद्रयान 3, भारत आणि सामान्य लोकांना मोहिमेचा काय फायदा होणार?

मराठी माणसाने नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकला

“चिंतामणराव देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पंडित नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकला तो याच इमारतीत. राजीनाम्याच्या संदर्भातले निवेदन लोकसभेत करताना हा स्वाभिमानी मराठी माणूस त्या महान सभागृहात कडाडला, “नेहरूंचा स्वभाव लोकशाहीवादी नाही. आपलेच म्हणणे ते हट्टाने मांडतात. त्याचाच हट्ट धरतात. तीच गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीत झाली. दि. 16 जानेवारीची घोषणा मंत्रिमंडळास विचारून झाली नाही!” (16 जानेवारीला आकाशवाणीवरून पंडित नेहरूंनी मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय जाहीर केला होता.) देशमुखांच्या राजीनाम्याने लोकसभा हादरली व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यास नवी ऊर्जा मिळाली. हिंदुस्थानी संसदेची जडणघडण ही अशीच होत गेली,” अशी आठवण या लेखात राऊत यांनी सांगितली आहे.

ज्या पार्लमेंटवर बॉम्ब टाकण्याची योजना आम्ही आखली ते पार्लमेंट…

“ही इमारत जेव्हा पारतंत्र्यातील ब्रिटिश पार्लमेंट होती तेव्हा क्रांतिकारकांनी या ‘पार्लमेंट’वर बॉम्ब फेकले. त्यात सेनापती बापट होते. स्वातंत्र्यानंतर हे काही क्रांतिकारक हिंदुस्थानच्या संसदेत आले. त्यात सेनापती बापट होते. सेनापती संसदेत आले, पण त्यांना कोणी ओळखले नाही. एका परिचितास म्हणाले, “ज्या पार्लमेंटवर बॉम्ब टाकण्याची योजना आम्ही आखली ते पार्लमेंट कसे आहे ते पाहायला आलोय.” जुन्या ऐतिहासिक संसद भवनास विसरता येणे कठीण आहे. निर्दय व भावनाशून्य लोकच या संसद भवनास टाळे लावू शकतात. या इमारतीचा निरोप घेताना राजेंद्र कृष्णच्या दोन ओळी मला आठवल्या, ‘वो दिल कहां से लाऊं, तेरी याद जो भुला दे…'” असं म्हणत संजय राऊतांनी लेखाचा शेवट केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …