मुंबई विद्यापीठाच्या अलीकडेच पार पडलेल्या अधिसभेत युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्याची मागणी करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठ व त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मराठीला अधिकाधिक स्थान मिळावे, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा. यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, अशा प्रकारचा स्थगन प्रस्ताव युवासेनेच्या वतीने शीतल देवरुखकर शेठ यांनी मांडला होता. त्यानंतर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा म्हणून निवेदन दिले होते. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यापीठाने हे परिपत्रक जारी केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत –
– सहज दिसेल अशा पद्धतीने महाविद्यालयाच्या नावाचा मराठी भाषेतील फलक दर्शनी भागात लावावा
– महाविद्यालयांची माहिती पुस्तके, प्रवेश अर्ज मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्यात यावेत
– महाविद्यालयांच्या पत्रव्यवहारात प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा
– महाविद्यालयांमध्ये सूचना मराठीतून लिहिण्याला प्राधान्य द्यावे
– कार्यशाळांमध्ये प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा
– मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात यावा. या दिवशी विविध चर्चासत्रे स्पर्धा यांचे आयोजन करण्यात यावे